ठाणे - स्टेशन परिसरात फेरीवाल्यांकडून ५२ वर्षीय महिलेला मारहाण झाल्यानंतर रेल्वे हद्दीतील तसेच सॅटीस खालील फेरीवाले गायब झाले होते. परंतु तरी देखील रात्रीच्या सुमारास सॅटीसखाली फेरीवाल्यांचा विळखा दिसत असून महापालिका या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी अॅक्शन मोडमध्ये आली आहे. त्यानुसार स्टेशन परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने याठिकाणी दोन सत्रत दोन पथके सज्ज करण्याचे निश्चित केले आहे. कोणत्या वेळेत फेरीवाल्यांचा वावर या भागात जास्त असतो, त्यावेळेत ही पथके कारवाईसाठी सज्ज ठेवली जाणार आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा वाढतांना दिसून आली आहे. रेल्वे पुलावरुन चालतांना बाकडय़ाचा अडथळा वाटल्याने फेरीवाल्याला विचारणा करणा:या ५२ वर्षीय महिलेला फेरीवाल्यांच्या टोळकीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरानंतर दोन फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र फेरीवाल्यांचे प्रस्थ पुन्हा ठाण्यात वाढतांना दिसत आहे. या घटनेनंतर फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई केली गेली. तसेच स्टेशन परिसर देखील फेरीवालामुक्त करण्यात आला. परंतु आता नवरात्रोत्सवाच्या काळात स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचे प्रस्थ पुन्हा वाढल्याचे दिसून आले आहे. सॅटीसखाली आणि वरील बाजूस देखील फेरीवाल्यांनी रस्ते अडविल्याचे चित्र दिसून आले आहे. पालिका कारवाई करण्यासाठी येत असतांना त्याची माहिती अगावू स्वरुपात या फेरीवाल्यांना दिली जात असल्याने फेरीवाल्यांना पाठीशीच घालण्याचा प्रकार आजही शहरात सुरु असल्याचेच दिसत आहे.
परंतु आता महिलेला झालेल्या मारहाणीनंतर पालिका पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. त्यानुसार सकाळी १० ते रात्री १२ या वेळेत स्टेशन परिसरात फेरीवालांचा वावर अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार दुपारी १२ ते रात्री १२ या वेळेत स्टेशन परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी दोन पथके सज्ज केली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिली. त्यानुसार आता नौपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना तशी माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी देखील होती पथके तरीही होते फेरीवालेयापूर्वी देखील तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात येथे फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पथके सज्ज ठेवण्यात आली होती. तसेच वाहन देखील या ठिकाणी होते, मात्र तरी देखील या ठिकाणी फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढतांना दिसून आले होते. त्यामुळे आता नव्याने पथके नेमल्यानंतर फेरीवाले कमी होतील का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.