मीरा रोड : शहरातील मुख्य रस्ते - नाक्यांवरील ना फेरीवाला क्षेत्रात तसेच रेल्वे स्थानकापासून १५० मीटर, तर रुग्णालय, शैक्षणिक संकुल, धार्मिक स्थळांपासून १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई असताना मीरा-भाईंदर महापालिका मात्र अशा फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर गल्लीपासून पालिका मुख्यालयापर्यंत अर्थपूर्ण वरदहस्त असल्याचे आरोप जनसामान्यांकडून होत आहेत.
भाईंदर व मीरा रोड रेल्वे स्थानकास फेरीवाल्यांचा विळखा पडलेला आहे. आधीच रेल्वे स्थानक परिसरात मोठी गर्दी होऊन चालणेसुद्धा अवघड झालेले आहे. शहरातील मुख्य रस्ते, पदपथ, प्रमुख नाके व गर्दीची सार्वजनिक ठिकाणेदेखील बेकायदा फेरीवाले, टपरी व हातगाडीवाल्यांच्या विळख्यात अडकलेली आहेत. अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन नागरिकांसाठी पदपथच शिल्लक राहिलेले नाहीत. या बेकायदा फेरीवाल्यांना अनधिकृतपणे वीज पुरवठा केला जात असताना वीज कंपन्यांना पालिकेने केवळ पत्र देऊन हात वर केले आहेत. वीज कंपन्यासुद्धा बेकायदा वीज जोडण्यांवर कारवाई करीत नाहीत. फेरीवाले व हातगाडीवाले बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व वस्तू वापरत असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. रस्त्यावर हातगाडीवाले गॅस सिलिंडरचा सर्रास वापर करीत असून, आग लागण्याच्या दुर्घटना होऊनदेखील पालिका गंभीर नाही.
हातगाड्या, फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाईसाठी नेमलेली फेरीवाला पथके व त्यांचे प्रमुख प्रभाग अधिकारी यांच्याकडून सातत्याने कारवाई केली जात नाही. मुळात फेरीवाला विरोधी पथकाने दिवस-रात्र गस्त घालून कारवाई करणे व आपल्या भागात फेरीवाले नसल्याचे छायाचित्र वरिष्ठांना सादर करणे आवश्यक आहे. परंतु, वरिष्ठ अधिकारीच गंभीर नसल्याने ठोस कारवाई तर सोडाच, उलट नवनवीन फेरीवाले झपाट्याने वाढत आहेत.
व्यापक कारवाईची गरज
फेरीवाल्यांवर विशेषतः सायंकाळी व रात्री व्यापक कारवाईची गरज आहे. फेरीवाले वाढल्याने मुख्यत्वे बाजार वसुली ठेकेदाराचा मोठा फायदा होत आहे. फेरीवाल्यांकडून वसुलीचे प्रकार पूर्वीसुद्धा उघड झाले असून, फेरीवाला हा कमाईचे सोपे साधन मानले जात आहे. फेरीवाल्यांविरुद्ध मुद्दा तापला की थातूरमातूर कारवाई दाखवून प्रसिद्धी मिळवायची असा कार्यक्रम जणू पालिकेचा सुरू आहे. त्यामुळे यामागे भ्रष्टाचाराचा संशय जागरूक नागरिक व्यक्त करत आहेत.