उल्हासनगर : शहरातील कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्याच्या शांतीनगर वेलकम गेट ते महापालिका कल्याण अंबरनाथ रस्त्यावर बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्या विरोधात महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने गुरवारी धडक कारवाई केली. विभागाच्या २ तासाच्या कारवाईत ४८ हजाराचा दंड वसूल केला असून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
उल्हासनगराच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर बेकायदा रस्त्यावर गाडी पार्किंग केली जात असल्याने, मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी, प्रभाग अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी, दत्तात्रय जाधव, जेठानंद करमचंदानी यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके, पोलीस कर्मचारी यांनी गुरवारी दुपारी बेकायदेशीर रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनावर संयुक्त कारवाई केली. त्याच बरोबर रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
महापालिकेच्या या धडक कारवाईनंतर रस्त्यावर असेच वाहने बेकायदा पार्किंग केलेली असल्यास पुन्हा कारवाईचे संकेत दिले. व्यापारी दुकाना समोरील पदपथावर लोखंडी जाळी तसेच दुकानातील साहित्य ठेवत असल्याने, नागरिकांना जाण्यास अडथळा निर्माण झाला. काही व्यापारी रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने विक्रीस ठेवत असल्याने, अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या गाडी खाली केरकचरा साठून स्वच्छतेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकली आहे. अश्यावर कारवाई होणार असल्याचे अतिरिक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.