उल्हासनगर : शालेय 'फी'साठी पालक व मुलांकडे तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे संकेत पत्राद्वारे शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी एम मोहिते यांनी दिले आहेत. शालेय 'फी'साठी तगादा लावणाऱ्या शाळांच्या तक्रारी आल्यानंतर मनसे विद्यार्थी संघटनेचे शहर उपाध्यक्ष कल्पेश माने यांनी प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी केली.
उल्हासनगरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण संख्या ६ हजार झाली असून कोरोनाच्या संसर्ग भीतीने राज्य शासनाने शाळा बंद ठेवल्या आहेत. मात्र मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून अनेक शाळांनी इयत्ता ७ ते १० वीचे ऑनलाईन शैक्षणिक वर्ग सुरू केले. दरम्यान त्यापैकी काही शाळांनी मुलांना व पालकांना मेसेज करून शिक्षकांचा पगार व इतर शाळा खर्च भागविण्यासाठी दरमहा शालेय फी भरा, असे एसएमएसद्वारे सुचविले आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळे ते शालेय फी अदा करू शकत नाही. तसेच राज्य शासनाने आदेश काढून शाळांनी फीसाठी मुले व पालकांकडे तगादा लावू नका, असे बजावून कारवाईचे संकेत दिले.
मनसे विद्यार्थी सेनेचे शहर उपाध्यक्ष कल्पेश माने यांच्याकडे शालेय 'फी'साठी तगादा लावल्याचा शाळेच्या असंख्य तक्रारी मुले व पालकांच्या आल्या आहेत. त्यांनी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी एम मोहिते यांची भेट घेवून शहरातील शाळांची भयाण परिस्थिती कथन केली. तसेच शालेय 'फी'साठी तगादा लावणाऱ्या शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली. मोहिते यांनी शहरातील अनुदानित, विनाअनुदान शाळांना पत्र पाठवून शालेय 'फी'साठी तगादा लावणाऱ्या शाळेवर कारवाई का करू नये. असे पत्र बजाविली आहे. प्रशासन अधिकाऱ्याच्या पत्राने शाळा संस्था चालकांचे धाबे दणाणले आहे.