सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिकेने मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारां विरोधात पुन्हा सोमवारी दंडात्मक कारवाई करून दुकाने सील करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिला. तसेच मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांकडून दिवसाला २ हजार रुपये दंड ठोठावून दुकाने सील करण्याचा निर्णय घेतल्याने, दुकानदार व महापालिका आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झालीं आहे.
उल्हासनगर महापालिकेने शासन व न्यायालयाच्या आदेशानुसार दुकानदारांसह इतर आस्थापनाना मराठी भाषेत ठळक अक्षरात पाट्या लावण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांना नोटिसा देऊन कारवाईचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतरही बहुतांश दुकानदारांनी ठळक अक्षरात मराठी नावाच्या पाट्या न लावल्याने, मनसेच्या पदाधिकार्यांनी मनसे स्टाईलने कारवाईचा इशारा दिला होता. महापालिकेच्या आवाहनाला दुकानदारानी सहकार्य केले नसल्याने, अखेर महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यासह महापालिका अधिकारी रस्त्यावर उतरून मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकांदारावर गुरवारी पासून दंडात्मक कारवाई सुरू केली असून सोमवारी कारवाई सुरू ठेवली आहे.
महापालिका आयुक्त अजिज शेख यांच्या आदेशाने, मराठी पाट्या न लावणाऱ्या विरोधात अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, प्रभारी प्रभाग अधिकारी दत्तात्रय जाधव, जेठानंद व अनिल खतुरानी आणि बाजार व परवाना विभागाचे विभाग प्रमुख विनोद केणे आदींच्या पथकाने दुकानदारांवर कारवाई सुरू केली. जो कोणी शासनाच्या अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणार, त्याच्यावर एक लाख रुपयांपर्यंत दंडासह शिक्षेची तरतूद असल्याचे संकेत महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ३१३ अन्वये कारखाने व धंदे इत्यादीसाठी व कलम ३७२ ते ३८६ मधील तरतुदीनुसार परवाना फी घेवून परवाना घेणे आवश्यक असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिली आहे.
लाखोंची दंडात्मक रक्कमेची वसुली :
दुकानदारांसह शासकीय व निमशासकीय आस्थापनाने ठळक अक्षरात मराठी पाट्या न लावण्याऱ्या विरोधात महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली. या करवाईतून लाखोंचा दंड वसूल झाला असून दुकाने सील करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे.