लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने मास्क न घालणाऱ्यांवर धडक कारवाई करीत फक्त ३ दिवसांत ७६७ जणांवर कारवाई करून २ लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला. अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त नाईकवाडे, सहायक आयुक्त व कोरोना समन्वयक गणेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत आहे.प्रभाग समितीनिहाय सकाळ व संध्याकाळी विशेष मोहीम राबवून मास्क न घालणाऱ्या नागरिक व दुकानदारांविरोधात पोलिसांच्या मदतीने महापालिका अधिकारी व कर्मचारी कारवाई करीत आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली असून दुसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन झाल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा सहायक आयुक्त व कोरोना समन्वयक गणेश शिंपी यांनी दिला. १ फेब्रुवारी रोजी १४१ नागरिकांवर तसेच ४ दुकानदारांवर, २ फेब्रुवारी रोजी २५७ नागरिकांवर व १० दुकानदारांवर, तर ३ फेब्रुवारी रोजी ३६९ नागरिक व ६ दुकानदार असे एकूण ७६७ नागरिक व २० दुकानांवर कारवाई करून २ लाखांपेक्षा जास्त दंडात्मक कारवाई केल्याची माहिती गणेश शिंपी यांनी दिली.महापालिका कारवाईच्या भीतीने नागरिक मास्क वापरत असून अजूनही गर्दीच्या ठिकाणी व दुकानात मास्क वापरत नसल्याचे चित्र आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या सरासरी २० पेक्षा कमी असून कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी दिली. तसेच मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले असून नागरिक व दुकानदार यांनी नियमाचे पालन करण्याचे आवाहन उपायुक्त नाईकवाडे यांनी केले. प्रशासनाचे बारीक लक्ष आहे.दुसऱ्यांदा दिसल्यास गुन्हा दाखल होणारमहापालिका आरोग्य विभागाने कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी शांतीनगर येथील खासगी रुग्णालय दरमहा २० लाख रुपये भाडेतत्त्वावर घेतले आहे. तसेच आरोग्य केंद्र तैनात ठेवून कोरोनाकाळात उभ्या केलेल्या कोणार्कजवळील लॅबमध्ये २४ तास कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.
मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 2:13 AM