मीरा रोड : कोरोनाचा घातक असा डेल्टा प्लस विषाणू आणि तिसऱ्या लाटेचा धोका पाहता, मीरा-भाईंदर महापालिकेने शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका व पोलिसांच्यावतीने कारवाई सुरू केली आहे. उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिला आहे. सोमवारी पालिकेने दोन दुकानांना सील ठोकत ३९ हजारांचा दंड वसूल केला.
डेल्टा प्लस आणि शहरात निर्बंधाचा तिसरा स्तर लागू असल्याची काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त ढोले यांनी वैद्यकीय अधिकारी, प्रभाग अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. या चर्चेत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त मारुती गायकवाड, संजय शिंदे व डॉ. संभाजी पानपट्टे, प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.
कोरोनाची तिसरी लाट जास्त धोकादायक ठरणार असून, निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर निर्बंधाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन शहरात होणार नाही, यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने प्रभागनिहाय प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत सोमवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत कारवाई केली गेली. प्रभाग समिती क्रमांक ५ मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन दुकानांना सील ठोकण्यात आले. एकूण ७ दुकानांवर दंडात्मक कारवाई करून १४ हजार दंड वसूल केला. यावेळी २० हातगाड्या तोडण्यात आल्या.
प्रभाग कार्यालय क्रमांक १ भाईंदर (पश्चिम) मध्ये मॅक्सस मॉलमागे शक्तिडोसा दुकानावर कारवाई करत २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. उपायुक्त अजित मुठे, प्रभाग अधिकारी हंसराज मेश्राम, अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, योगेश भोईर यांनी कारवाई केली.