बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या कै. दुबे रुग्णालयात लसीकरणावरून सुरू असलेल्या गोंधळाबाबत मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. यापुढे लसीकरणाच्या कामात गोंधळ झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या कै. दुबे रुग्णालयात लसीकरणासाठी सोमवारी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. लसीकरणासाठी रुग्णालयात सोडण्यावरून पालिकेचे सुरक्षारक्षक व नागरिकांत शाब्दिक वाद सुरू होते. पालिका कार्यालयाच्या इमारतीतून खाली येत असताना मुख्याधिकाऱ्यांच्या हे निदर्शनास येताच त्यांनी पालिका कार्यालयाच्या आवारात झालेल्या या गर्दीबाबत सुरक्षारक्षक व पालिकेच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ज्यांना टोकन दिले आहे. त्यांनाच रांगेत उभे करून बाकीची गर्दी कमी करण्याचे आदेश त्यांनी सुरक्षारक्षकांना दिले. त्यानंतर, त्यांनी लसीकरण सुरू असलेल्या पालिकेच्या कै. दुबे रुग्णालयात जाऊनही पाहणी केली. त्यावेळी नगरपालिकेच्या इतर विभागांत काम करणारे कर्मचारी तसेच काही कंत्राटी कर्मचारी ही तिथे आढळून आले. त्यावर अशा सर्व कर्मचाऱ्यांना तेथून बाहेर काढण्याचे व पुन्हा येथे आढळल्यास कायदा कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुख्याधिकाऱ्यांच्या या भूमिकेचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे. अशा प्रकारे शिस्तबद्धरीत्या लसीकरण मोहीम सुरू राहिल्यास निश्चितच नियमानुसार, टोकन घेऊन लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. तसेच, गर्दी कमी होऊन सुरू असलेला गोंधळही संपेल, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
रांगेतील नागरिकांनाच प्राधान्य द्या
नियमानुसार टोकन घेऊन रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात यावी. इतर कोणालाही लसीकरणासाठी मधेच रांगेत सोडू नये. असा प्रकार आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
----------
फोटो