ठाणे : ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांची प्रभाग समितीनिहाय यादी येत्या सोमवारपर्यंत तयार करून ४ सप्टेंबरपासून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शुक्रवारी सर्र्व सहायक आयुक्तांना दिले.शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, कोरोना कोविड-१९ च्या चाचण्यांची संख्या वाढविणे आणि मालमत्ताकर वाढविणे, याचा आढावा घेण्यासाठी त्यांनी शुक्रवारी सर्व उपायुक्त आणि सहायक आयुक्तांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची संख्या कमी झाली आहे, ही चांगली बाब असली, तरी गाफील राहून चालणार नाही, असे स्पष्ट करून महापालिका आयुक्तांनी यापुढे मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढावी, यासाठी सहायक आयुक्तांनी प्रयत्न करावेत, असे सांगितले.नवीन मालमत्तांचा शोध घेण्याच्या सूचनामालमत्ताकर वसुलीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सर्व सहायक आयुक्तांनी त्यांच्या अधिपत्याखालील करनिरीक्षकांना प्रभागातील नवीन मालमत्ता शोधून त्यांना करआकारणी करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच किती नवीन मालमत्तांना करआकारणी केली, त्याचा अहवाल आयुक्त कार्यालयास सादर करावा, असे सूचित केले.