ठाणे : ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुरेश गडा यांच्या येऊर येथील बंगल्यावर सुरु असलेल्या पार्टीत डीजेचा धांगडदिंगा करणाऱ्यांविरुद्ध वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील येऊर गाव हे शांतता क्षेत्र म्हणून वनविभागाने घोषित केले आहे. गडा यांच्या ‘लायन पार्क’ या बंगल्यावर १३ डिसेंबर रोजी अशीच एक पार्टी डीजेच्या जोरदार आवाजात रंगल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. जी. गावीत यांच्या पथकाने डीजे जप्तीची तसेच दंडाची कारवाई केली. मुंबई पोलिस कायदा ३३/ डब्ल्यू अंतर्गत डीजे वादक हरिश गोंधळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)माझ्या एका मित्राच्या घरातील लग्न समारंभानिमित्त लायन पार्कवर पार्टी होती. त्यावेळी मी मुंबईत होतो. याठिकाणी सायंकाळी ७ ते १० पर्यंत ध्वनीक्षेपकास परवानगी आहे. परंतु, पोलिसांनी रात्री ७.३० वाजताच डीजे जप्तीची कारवाई केल्याने त्यानंतर डीजे वाजविण्यात आलाच नाही.’’- सुरेश गडा, माजी सभापती, शिक्षण मंडळ, ठाणे महापालिका
डीजे सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: December 16, 2015 2:04 AM