उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील मासे व मटन मार्केट मधील १८ दुकानाचवर पाडकाम कारवाई केली. कारवाई दरम्यान एका दुकानदाराने स्वतःच्या गळ्यावर सुरा ठेवल्याने, खळबळ उडून परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले होते.
उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात मासे व मटन मार्केट आहे. मार्केटमधील बहुतांश दुकानें रस्त्यावर आल्याने, वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोलिस संरक्षणात रस्त्यावर आलेल्या दुकानावर पाडकाम कारवाई सुरू केली. अचानक झालेल्या कारवाई मुळे दुकानदार एकच खळबळ उडाली. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली पाडकाम कारवाई सुरू होती. कारवाई दरम्यान दुकानदार व अतिक्रमण पथक प्रमुख गणेश शिंपी यांच्यात तू तू मैं मैं व बोलाचाली सुरू होती. त्यावेळी एका दुकानदाराने स्वतःच्या गळ्यावर सुरा ठेवून कारवाई थांबवा. अशी विनंती केल्याने, परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले. अखेर माजी नगरसेवक दर्शनसिंग खेमानी यांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले.
महापालिका अतिक्रमण पथकाने एकून १८ दुकानावर कारवाई केली. मार्केट मधील दुकानामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने दुकानावर कारवाई केल्याची प्रतिक्रिया सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तर दुकानांना नोटीस न देता धडक कारवाई केल्याचा आरोप दुकानदार व माजी नगरसेवक दर्शनसिंग खेमानी यांनी केला. दुकानावर कारवाई केल्याने रस्ता मोकळा झाला असून महापालिकेच्या कारवाईचे स्वागत नागरिकांनी केले आहे.