उल्हासनगर : शहरातील कैलास कॉलनीसह इतर विभागातील पाच बहुमजली अवैध बांधकामावर उपायुक्त प्रियंका रजपूत यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी कारवाई केली. या कारवाईने भूमाफियांचे धाबे दणाणले असून, बहुमजली अवैध आरसीसी बांधकामावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
उल्हासनगर कॅम्प नं.-५, कैलास कॉलनी, पटेलनगर येथील एकूण पाच बहुमजली अवैध बांधकामासह महापालिका अतिक्रमण पथकाने मंगळवारी दुपारी कारवाई केली. कोरोनाच्या गेल्या एक वर्षाच्या कालावधीत उभ्या राहिलेल्या शेकडो अवैध बांधकामांवर कारवाई झाली नसल्याने, प्रशासनावर सर्वस्तरातून टीका झाली. अखेर मंगळवारी पथकाने कारवाई केली. सहा महिन्यापूर्वी अवैध बांधकामावरून आयुक्तांवर टीका झाल्यावर आयुक्तांनी प्रभाग अधिकाऱ्यांची बदली करून प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. तसेच तत्कालीन उपायुक्त मदन सोंडे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांकडून अवैध बांधकामाची यादी मागविली होती. मात्र त्यानंतरही कारवाई झाली नाही. मात्र बदली केलेल्या प्रभाग अधिकाऱ्यांची पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्ती केल्याने प्रशासनावर टीका झाली.
शहरातील इतर बांधकामांवर कारवाईची मागणी होत असून, कॅम्प नं.-३ येथील संत कंवाराम चौकात जुन्या इमारतीवर दुमजली अवैध बांधकाम झाले. येथे मोठी दुर्घटना होण्यापूर्वी कारवाईची मागणी होत आहे. तसेच कॅम्प नं. -५ येथील महापालिका शाळा प्रांगणात उभ्या राहिलेल्या अवैध बांधकामावर कारवाईची मागणी स्थानिक नगरसेविकेने केल्याने, सरकारी जागा सुरक्षित नसल्याचे उघड झाले.
..........