डोंबिवली : पश्चिमेतील अतिधोकादायक गोडसे इमारतीत दुर्घटना झाल्यानंतर केडीएमसीने गुरुवारपासून इमारतीच्या पाडकामाला सुरुवात केली आहे. शुक्रवारी या इमारतीचे दोन मजले पाडण्यात आले. तसेच संध्याकाळी गाळे पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली असून शनिवारी हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.‘ह’ प्रभागक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पाडकाम सुरू आहे. ठेकेदाराचे ३० कामगार, महापालिकेचे १० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. महापालिकेचे नऊ पोलीस तसेच विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पाच आणि वाहतूक विभागही याठिकाणी तैनात आहे. कंखरे म्हणाले की, सर्व रहिवासी, गाळेधारकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. गाळेधारकांना आधीच सामान इतरत्र हलवण्याचे आदेश दिलेले होते.शुक्रवारी बहुतांश काम झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने महात्मा गांधी शाळेपर्यंत महात्मा फुले रस्ता रहदारीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पादचाऱ्यांनाही हा रस्ता टाळण्याचे आवाहन केलेले होते; मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणावर इमारती असल्याने कारवाईदरम्यान अनेकदा अडथळे आल्याचे कंखरे म्हणाले.पार्वती इमारतही पाडणार? : पूर्वेकडील पाटकर रस्त्यालगतच्या पार्वती इमारतीला गुरुवारी रात्री महापालिकेने सील ठोकले होते. मात्र, या इमारतीतील रहिवासी आणि गाळेधारकांनी दुरुस्ती करण्याची तयारी दाखवत शुक्रवारपासून कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. याबाबत ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी दीपक शिंदे म्हणाले की, ‘ही इमारत ४२ वर्षे जुनी असून दुरुस्ती करता येणे शक्य नाही. त्यामुळे इमारत पाडण्याशिवाय पर्याय नाही. त्यासंदर्भात वरिष्ठांशी बोलून अंतिम निर्णय घेतला जाईल.’
गोडसे इमारतीवर कारवाई; दोन मजले पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 11:48 PM