भार्इंदर : मीरा रोडच्या रामदेव पार्कमधील परप्रांतीय फेरीवाल्यांना झुकते माप देत पालिकेने बुधवारी शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाची पावभाजीची हातगाडी जेसीबीने चक्काचूर केली. शिवसेनेसह स्वाभिमान संघटना व मराठी एकीकरण समितीने अतिरिक्त आयुक्त माधव कुसेकर यांना गुरुवारी घेराव घालत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत पालिकेने येथील सर्वच फेरीवाल्यांवर कारवाई करत त्यांच्या हातगाड्या तोडल्या.
येथील फेरीवाल्यांची संख्या बाजार फी वसूल करणाऱ्या कंत्राटदारांमुळे वाढल्याचे आरोप होत असताना प्रशासन त्याविरोधात कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोपही केला जात आहे. आपापल्या क्षेत्रातील फेरीवाल्यांकडून त्यांनी हे हप्ते घेण्यास सुरुवात केली. महिनाकाठी एका फेरीवाल्याकडून सुमारे एक ते तीन हजार हप्तावसुली केली जाते. पाच हजारांहून अधिक हातगाड्या भाड्याने दिल्या आहेत. त्यापोटी महिन्याला सुमारे साडेतीन ते चार हजार भाडे वसूल केले जाते. प्रत्येकाची हातगाडी ओळखता यावी, याकरिता त्यांच्या लोखंडी पट्ट्यांना वेगवेगळा रंग दिला जातो. याच हातगाड्या फेरीवाल्यांनी भाडेतत्त्वावर घ्याव्यात, असा अलिखित नियम केल्याने फेरीवाल्यांनी स्वत:च्या हातगाड्या लावल्यास त्या जप्त करून तोडल्या जातात. या दहशतीमुळेच फेरीवाले त्या हातगाड्या भाड्यावर घेतात.परप्रांतीय फेरीवाल्यांवर पालिकेची मेहरनजरबुधवारी मीरा रोड येथील रामदेव पार्कमधील कारवाईवरून शहरात चर्चा सुरू झाली. प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांच्या नियंत्रणाखालील पथकाने उपविभागप्रमुख विशाल मोरे व प्रशांत सावंत यांची हातगाडी जेसीबीने तोडली. त्यावेळी तेथील परप्रांतीय फेरीवाल्यांवर मेहरनजर दाखवल्याने अतिरिक्त आयुक्तांना गुरुवारी घेराव घातला. सर्वच फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार, शुक्रवारी कारवाई करण्यात आली.