ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील अनधिकृत हॉटेल्सची बांधकामे, हुक्कापार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील नागलाबंदर, रेतीबंदर जी.बी. रोड येथील हुक्कापार्लर तसेच अनधिकृत हॉटेल्सवर धडक कारवाई करून शेडचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.
महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत हुक्कापार्लर सुरू असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी पत्राद्वारे कळविल्यानंतर आयुक्तांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागास दिले होते. त्यानुसार गुरुवारी मौजे नागलाबंदर, रेतीबंदर जी.बी. रोड येथील पिंक बाबा हॉटेलच्या शेडचे बांधकाम, पाच लाकडी मचान व बांबू ताडपत्री शेडचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.
ओवळा येथील ब्लुरुफ वेलवेट गार्डन या हॉटेलच्या शेडचे बांधकाम तसेच नाका हॉटेलच्या शेडचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. ही कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर यांच्यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच महापालिकेच्या अधिकृत ठेकेदाराचे २० मजूर, एक जेसीबी मशीन, दोन डम्पर इत्यादींच्या साहाय्याने करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.
दोन अतिधोकादायक इमारती जमीनदोस्तकल्याण : डोंबिवली पश्चिमेतील दोन अतिधोकादायक इमारती शुक्रवारी केडीएमसीच्या पथकाने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार जमीनदोस्त केल्या. कोपर गाव व शिवमंदिर रोडवरील या दोन इमारती होत्या. शिवमंदिर रोडवरील अतिधोकादायक इमारत ४८ वर्षे जुनी होती. प्रभाग अधिकारी भारत पवार यांनी ही कारवाई केली. या दोन्ही इमारती जीर्ण झाल्या होत्या. त्यांच्या मालकीबाबत वाद असल्याने या इमारती वास्तव्याविना पडून होत्या. या इमारतींप्रकरणी नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. या इमारतींना मनपाने यापूर्वीच अतिधोकादायकच्या नोटिसा बजावल्या होत्या.