लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रातील दिवानशाह दर्गा ट्रस्टच्या जमिनीवर सुरू असलेल्या बेकायदा बांधकामावर रविवारी कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकामाकरिता वापरण्यात येत असलेली यंत्रे जप्त करण्यात आली.
भिवंडीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारत बांधकाम सुरू असून अशा अनधिकृत व धोकादायक इमारतींच्या दुर्घटनांच्या घटना भिवंडी शहरात वरचेवर घडत असतात. पाच महिन्यांपूर्वी भिवंडीत जिलानी इमारत दुर्घटना होऊन ३८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिल्यानंतरही काही बिल्डर रविवार अथवा सुट्टीच्या दिवशी बांधकाम सुरू ठेवून बेकायदा इमले चढवत असतात. भिवंडी महापालिका क्षेत्रातील दिवानशाह दर्गा ट्रस्टच्या जमिनीवर एका इमारतीचे अनधिकृत बांधकाम सुरू असून दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबचे काम रविवारी सुरू असताना विशेष पथकाने त्या ठिकाणी कारवाई करीत सर्व यंत्रसामग्री जप्त केली. मौजे गौरीपाडा येथील सर्व्हे क्रमांक १४ ही दिवानशाह दर्गा ट्रस्टची जमीन असून या जमिनीवर एका इमारतीचे बांधकाम मागील वर्षभरापासून सुरू आहे. मागील वर्षी या अनधिकृत बांधकामावर जुजबी कारवाई केली गेली. त्यामुळे बिल्डरने पुन्हा बांधकाम सुरू केले असल्याने ठोस कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. आशिया यांनी दिले. आयुक्तांनी शहरविकास अधिकारी शाकीब खर्बे यांना या बांधकामावर पाळत ठेवण्याची जबाबदारी देऊन सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम सुरू केल्यावर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. खर्बे यांनी रविवारी दुसऱ्या मजल्याचे स्लॅबचे काम सुरू असताना संबंधित प्रभाग समितीच्या कर्मचारी, अधिकारी यांना या कारवाईची कुणकुण लागू न देता अन्य प्रभाग समितीमधील बिट निरीक्षक व अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांच्या मदतीने कारवाई केली. जप्त केलेली यंत्रसामग्री महापालिका मुख्यालयात आणून ठेवली आहे. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
...........
वाचली