मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेने बुधवारी पोलीस बंदोबस्तात भाईंदर पूर्वेच्या प्राइम ऑर्केस्ट्रा बारच्या बेकायदा बांधकामावर तोडक कारवाई केली. भाईंदर पूर्वेस प्रभाग समिती क्र. ३ अंतर्गत फाटक मार्गावर महावीर इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये प्राइम ऑर्केस्ट्रा बार चालवला जात आहे. या बारचे पहिल्या मजल्याचे वाढीव बांधकाम बेकायदा असल्याने त्यावर कारवाई प्रस्तावित होती. या बांधकामावर बुधवारी आयुक्त दिलीप ढोले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.
सहायक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई, अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण आदींसह पालिका व पोलीस अधिकारी, कर्मचारी आदी या कारवाईवेळी उपस्थित हाेते. पोकलेनच्या सहाय्याने हे वाढीव बांधकाम तोडले. उपायुक्त गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रभागातील अनधिकृत बांधकामांचा आढावा घेण्यात आला आहे. बैठकीत सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभागातील बेकायदा बांधकामे, फेरीवाले, गॅरेज, पदपथावरील व्यावसायिक, बेकायदा होर्डिंग्ज, झोपड्या यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रभागातील बेकायदा बांधकामांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या अभियंता व बीट निरीक्षक यांनी दुर्लक्ष केल्यास त्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.