उल्हासनगर : शहरात रस्त्यांवर विनापरवानगी उभारलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिले. त्याबाबत, सविस्तर अहवाल २२ आॅगस्टला सादर करण्यास पालिकेला सांगितले आहे. विनापरवानगी उभारलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांवर पालिकेने शनिवारपासून कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे मंडळांचे धाबे दणाणले आहेत.उल्हासनगरातील अनेक मंडळांनी महापालिका परवानगी न घेताच रस्त्यावर मंडप उभारले. त्यामुळे नागरिकांना येजा करण्यास तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकाही जाऊ शकत नव्हत्या. याबाबत, ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानुसार, न्या. अभय ओक व रियाज इकबाल छागला यांच्या खंडपीठाने विनापरवाना रस्त्यात उभारलेल्या गणेश मंडपांवर कारवाईचे आदेश दिले. शहरात बेकायदा मंडपे उभारल्याची बाब हिराली फाउंडशेनने न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिली. फाउंडेशनचे वकील सना बागवाला यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली होती.हिराली फाउंडेशनने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी बेकायदा मंडपांची छायाचित्रेच फाउंडेशनने न्यायालयात सादर केली. महापालिकेतर्फे सहायक आयुक्त मनीष हिवरे उपस्थित होते. एकाही गणेश मंडळाला शुक्रवारपर्यंत मंडप उभारण्याची परवानगी दिलेली नाही. असे सांगताना बेकायदा उभारलेल्या मंडपांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन न्यायालयात दिले. न्यायालयाने याबाबतचा सविस्तर अहवाल २२ आॅगस्टला सादर करण्यास हिवरे यांना सांगितले.कॅम्प नं. ४ येथील बगाडे डेकोरेटर येथे रस्त्यावर बांधलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांवर शनिवारी हिवरे यांनी कारवाई केली. तर, कॅम्प नं. १ डी.टी. कलानी कॉलेजजवळ उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीला लागून एका मंडळाने बेकायदा मंडप उभारला आहे. त्यावर कारवाई करावी, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे. शहरात अनेक ठिकाणी बेकायदा मंडप उभारण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार मंडळांना स्वत:हून ते हटवावे लागणार आहेत.दरम्यान, फाउंडेशनने ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न ऐन दहीहंडी सणादरम्यान लावून धरला. त्यामुळे डीजेचा वापर दहीहंडीत न करण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला. परिणामी, शहरात दहीहंडी उत्सव साजरा झाला का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.एका दिवसात २१५ मंडळांना परवानग्या?महापालिकेची परवानगी न घेता अनेक गणेश मंडळांनी मंडप उभारले. जनहित याचिकेमुळे अशा मंडपांवर भरपावसात कारवाई करण्याची वेळ महापालिकेवर ओढवली आहे. शुक्रवारपर्यंत एकाही गणेश मंडळाला परवानगी दिलेली नव्हती. शनिवारी १६ मंडळांना, तर रविवारी २१५ मंडळांना मंडपांची परवानगी दिली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी सांगितले.
बेकायदा मंडपांवर उल्हासनगरात टाच, धाबे दणाणले, न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 6:31 AM