कल्याण : आरटीओ व वाहतूक नियंत्रण शाखेने कल्याण-डोंबिवलीत बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात शुक्रवारपासून कारवाई सुरू केली. त्यामुळे रिक्षाचालक धास्तावले आहेत. कारवाईच्या भीतीपोटी काही रिक्षाचालकांनी रिक्षा बंद ठेवल्या.
रिक्षाचालकांविरोधातील वाढत्या तक्रारींमुळे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी रिक्षाचालक, युनियन नेते, पोलीस, आरटीओ अधिकारी यांची १ आॅक्टोबरला बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी १० दिवसांमध्ये नियमानुसार रिक्षा चालवा, सुधारणा करा, अशी तंबी दिली होती. त्यानंतरही सुधारणा न झाल्याने बेशिस्त रिक्षाचालकांवर शुक्रवारपासून कारवाई सुरू झाली. त्यात कल्याण रेल्वेस्थानक, बिर्ला कॉलेज, दुर्गाडी चौक, कल्याण-शीळ रोडवरील लोढा हेवन, काटई, तसेच डोंबिवली स्टेशन परिसरात कारवाई करण्यात आली.
नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाºया रिक्षाचालकांवर कारवाई केली जात आहे. बेशिस्त चालकांना शिस्त लागेपर्यंत कारवाई सुरूच राहील, असे आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी सांगितले.