ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाने दिवा, दातिवली परिसरातील गावठी दारुच्या अड्डयांवर गुरुवारी सकाळी धाडसत्र राबविले. या धाडीत तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १९८० लीटर गावठी दारूसह इतर सामुग्री असा एक लाख सात हजार ६१० रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाण्याचे अधीक्षक एन. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, पी. पी. घुले आदींच्या पथकाने १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान दातिवली आणि दिवा गावाच्या पश्चिमेकडील सूर्यानगर आणि बिराणा या परिसरात गावठी दारुची विक्री करणा-या मिलिंद मुरलीधर पाटील (४०, रा. दातिवली, ठाणे), प्रशांत काळे (२६, रा. घाटकोपर, मुंबई) आणि किरण त्र्यंबक मोकाशी (६५, रा. बिराणा, ठाणे) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १९८० लीटर गावठी दारु, प्लास्टीकच्या कॅनसह इतर सामुग्री जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई- नाना पाटीलब-याचदा कारवाई करणा-या पथकाची चाहूल लागताच आरोपी निसटतात. गुरुवारच्या दिव्यातील कारवाईमध्ये मात्र तीन मद्य विक्रेत्यांना अटक करण्यात आल्याचे अधीक्षक नाना पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकालानंतर मोठ्या प्रमाणात मद्य विक्री होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.