मीरा रोड : गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या २८ धोकादायक इमारतींपैकी आतापर्यंत नऊ इमारतीच तोडल्या आहेत. तीन इमारतींचे प्रकरण न्यायालयात तर तीन इमारतींना दुरुस्तीची परवानगी दिली आहे. धोकादायक झालेल्या नऊ इमारतींमध्ये आजही रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. मार्चअखेर या इमारती रिकाम्या करून जमीनदोस्त कराव्यात, असे आदेश पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. भार्इंदर व मीरा रोडमध्ये ग्रामपंचायत व नगरपरिषदेच्या काळात दाटीवाटीने वसलेल्या इमारती आता मोडकळीस आल्या आहेत. पालिका दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. तरीही, प्रत्यक्षात कारवाई होत नव्हती. इमारतींना नोटिसा बजावण्याशिवाय काहीच होत नसे. यातूनच इमारत वा भाग कोसळून गेल्या काही वर्षांत अनेकांचा मृत्यू झाला आहे. खारीगावातील लता इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या सर्वात जास्त होती.लतासह मुंबई, ठाण्यात धोकादायक इमारती कोसळल्यानंतर खडबडून जाग आलेल्या पालिकेने धोकादायक इमारती रिकाम्या करून तोडण्याची कारवाई काही अंशी सुरू केली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पालिकेने २८ धोकदायक इमारती जाहीर केल्या होत्या. त्यातील नऊ इमारती तोडण्यात आल्या. तीन इमारतींना स्ट्रक्चरल आॅडिटच्या अहवालानंतर दुरुस्तीची परवानगी देण्यात आली. तीन इमारतींचे प्रकरण न्यायालयात आहे. तर, नऊ इमारतींमध्ये आजही रहिवासी राहत आहेत. तर, चार इमारती रिकाम्या असून तोडण्याची कार्यवाही प्रलंबित आहे. वास्तविक, पावसाळ्याच्या आधीच या सर्व इमारती पाडणे आवश्यक होते. दुसरा पावसाळा तोंडावर आला असताना पालिका पुन्हा जागी झाली आहे. एप्रिलमध्ये पालिकेला धोकादायक इमारतींची यादी जाहीर करावी लागणार आहे. भार्इंदर पश्चिम प्रभाग समिती-१ मध्ये फिलोमीना गोम्स यांचे घर धोकादायक ठरवले आहे. आयुक्तांनी ते १९ मार्चपर्यंत तोडण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिमेस प्रभाग समिती-२ मध्ये तीन मजली उषाकिरण व गजानन निवास या धोकादायक इमारती असून गजानन निवासचे प्रकरण न्यायालयात आहे. भार्इंदर पूर्वेतील प्रभाग समिती क्रमांक-३ मध्ये डिव्हाइन शॅरेटॉन प्लाझा या इमारतीमध्ये रहिवासी राहतात. तर, समिती क्रमांक-४ मधील कल्याण कॉटेज, केतकी निवास, राजीव अपार्टमेंट, साई मंगलम व वेतोस्कर विहार या पाच धोकादायक इमारतींत नागरिक राहतात. यातील कल्याण कॉटेजचे प्रकरण न्यायालयात आहे. राजीव अपार्टमेंटची आयआयटीने तपासणी केली असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. तर, साईधाम रिकामी झाली असली तरी तेथे आजूबाजूला इमारती व मोठी गाडी जाण्याचा मार्गच नसल्याने ती तोडायची कशी, असा प्रश्न पालिकेला पडला आहे. मीरा रोडच्या प्रभाग समिती क्रमांक-५ मधील तेहमीना या इमारतीत रहिवासी आहेत. तर, चंदे्रश टॅरेसचे रहिवासी उच्च न्यायालयात गेले असून सुरूपी गुलशन इमारतीला दुरुस्तीची परवानगी दिली आहे. समिती क्रमांक-६ च्या हद्दीत मीरा धाम सी, जी व एच अशा तीन इमारती धोकदायक असल्या तरी त्या रिकाम्या आहेत. जागेचा वाद, परवानगी मिळण्यात असलेली अडचण यामुळे शहरात धोकादायक म्हणून तोडलेल्या अनेक इमारतींचे रहिवासी तर बेघर झाले आहेत. पुनर्विकास कधी होणार, याची शाश्वती नसल्याने रहिवासी इमारत रिकामी करण्यास तयार होत नाहीत. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात पालिका व नेते अपयशी ठरले आहेत. एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घर योजनेतून मिळालेल्या घरांमध्ये काहींना पर्यायी घरेभाड्यांनी दिली असली तरी त्यांची संख्यादेखील नाममात्र आहे.
नऊ धोकादायक इमारतींवर कारवाई
By admin | Published: March 13, 2016 2:33 AM