भिवंडी : ठाणे, पालघर जिल्ह्यातील वसई व भिवंडी तालुक्यातील तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य पर्यावरण संरक्षण क्षेत्र (इको सेन्सिटीव्ह) म्हणून केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे या अभयारण्याच्या एक किलोमीटर परिसरातील दगडखाण, क्र शर मशीन, डांबर प्लांट, सिमेंट मिक्सर प्लांट तसेच वीटभट्टी आदी पर्यावरणाला हानिकारक उद्योग बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी वैद्यही रानडे , प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर, तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्या आदेशाने खारबाव मंडळ अधिकारी भास्कर टाकवेकर, तलाठी गणेश पाटील यांनी नुकतीच मौजे पाये, ब्राह्मणगाव, पायगाव आदी गावांच्या हद्दीतील ४२ क्र शर मशीन सील केली आहे. यात एक डांबर प्लांट व एक सिमेंट मिक्सर प्लांटचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार पर्यावरण संरक्षण क्षेत्राजवळच्या दगडखाण, क्रशर मशीन व वीटभट्टी उद्योग बंद राहणार असल्याने येथील स्थानिक व्यावसायिकांसह मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाये गावाच्या हद्दीतील राजेश देवळीकर यांच्या क्र शर मशीनला सील ठोकल्याने त्याने गुपचूप सील तोडून क्र शर मशीन सुरू केली होती. त्याची माहिती मंडळ अधिकारी भास्कर टाकवेकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन देवळीकर यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
उद्योग, व्यवसायांवर संकट ओढावले
वसई व भिवंडी तालुक्यात विस्तार असलेल्या तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र ८०. ७० वर्ग किलोमीटर असून या अभयारण्यात विविध वन्य प्राण्यांसह दुर्मिळ पक्षी तसेच औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आहेत. या सर्व घटकांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्ययालयात याचिका दाखल करून तुंगारेश्वर अभयारण्य इको सेसीटीव्ह म्हणून जाहीर करण्याची मागणी लाऊन धरली होती.
सर्वोच्च न्ययालयाच्या आदेशानुसार केंद्राने तुंगारेश्वर इको सेंसीटीव्ह म्हणून जाहीर केल्याने भिवंडी तालुक्यातील मौजे पाये, ब्राह्मणगाव, पायगाव, खाडी, खारबांव , फिरिंगपाडा, गाणे, पालीवली, कुहे, धामणे, खडकी, आंबरराई, भुईशेत, पिंपळशेत आदी ग्रामपंचायतींच्या हद्दीत उद्योग, व्यसायावर संकट ओढवले आहे.