ठाणे: हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रात भरारी पथकांची पाहणी सुरू आहे. शुक्रवारी, पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर नाका येथे भरारी पथकाने डेब्रिज वाहून नेणाऱ्या दोन गाड्यांवर कारवाई केली. परिमंडळ दोनचे उपायुक्त आणि पर्यावरण विभाग यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एकूण १४० डम्पर वाहने तपासण्यात आली. त्यापैकी दोन वाहने बांधकामाचा डेब्रिज ठाण्याच्या हद्दीत आणत होती. त्या वाहनांना जॅमर लावण्यात आला. तसेच, प्रत्येकी पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाईही करण्यात आली. हे भरारी पथक या परिसरात अशाचप्रकारे अचानक भेट देऊन कारवाई करणार असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.
त्याचबरोबर, ठाणे महापालिका हद्दीत येणाऱ्या डम्परला डेब्रिज वाहतुकीचा स्कॅन कोड असणे बंधनकारक आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेचा डेब्रिज वाहतुकीस परवानगी असल्याचा परवाना आवश्यक आहे. त्याचबरोबर, गौण खनिजाची वाहतूक करताना त्याच्या रॉयल्टीची पावती सोबत असणे आवश्यक आहे. तसे याची माहिती देणारा फलक या भागात लावला जाणार असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी सांगितले.
आतापर्यंत ५ लाख १३ हजारांची दंडात्मक कारवाई महिनाभरात अशा १३८ वाहनांवर कारवाई करून ०५ लाख १३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, कचरा जाळणाऱ्या ५३ घटना नोंदवण्यात आल्या असून त्यांच्याकडून दंडापोटी ०२ लाख ०९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हवा प्रदूषण तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईनठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या आहेत. त्याचसोबत, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार, हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची हेल्पलाईन (८६५७८८७१०१) सुरू करण्यात आली आहे. त्यावर आतापर्यंत २२ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्रात होत असलेल्या हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी ८६५७८८७१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.