मीरारोड - मीरारोडच्या न्यायालय इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या बेकायदा ताडपत्री शेड वर महापालिकेने कारवाई केली. महापालिका आयुक्त दिलीप ढोले हे सदर परिसरात खड्ड्यांच्या कामांची पाहणी करत असताना न्यायालय इमारतीच्या परिसरात बस थांब्या लगत , दुकानांच्या बाहेर वा पदपथ - मोकळ्या जागां वर ताडपत्री व बांबूच्या शेड मोठ्या प्रमाणात झालेल्या दिसून आल्या .
ते पाहून आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्या नंतर मंगळवारी सहाय्यक आयुक्त योगेश गुणीजन, कनिष्ठ अभियंता विकास शेळके व सुदर्शन काळे, लिपिक महेंद्र गावंड, फेरीवाला पथक कर्मचारी सचिन साळुंखे यांनी जेसीबीच्या सहाय्याने १५ क्रमांक बस थांबा लगत असलेल्या ६ बांबू ताडपत्रीचे शेड तसेच दुकानांच्या बाहेरील १२ शेड तोडून टाकल्या. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान बंदोबस्तसाठी उपस्थित होते .
आयुक्तांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मारुती गायकवाड यांना प्रभागातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, गॅरेज, पदपथावरील व्यावसायिक, अनधिकृत होर्डिंग्ज, अनधिकृत झोपड्या वर सातत्याने कारवाई करण्याचे आदेश दिले . तसेच जाणीवपूर्वक कारवाई टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहेत .