लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : टोरंट पॉवरने कळवा-मुंब्रा-शीळ भागात वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध आता जाेरदार कारवाई सुरू केली आहे. वीज जोडणी नियमित करण्यासाठी विविध माध्यमांतून अनेकदा आवाहन करूनही या भागातील ग्राहक नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे आता ही कारवाई सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या भागातील १५ हजारांहून अधिक घरे पीडी थकबाकीच्या नावाखाली बेकायदा वीज वापरत आहेत. अशा ग्राहकांनी त्यांची प्रलंबित पीडी देय रक्कम भरून कायदेशीररीत्या वीज मीटर मिळवावेत, असे आवाहन टोरंट पॉवर कंपनीने केले आहे. कायदेशीर जाेडणीसाठी या भागातील रहिवासी पुढे येत नाहीत.सुमारे २१ हजार ५०० जाेडण्या शून्य किंवा त्याहून खूप कमी युनिट वापर दर्शवितात. यातील अनेकांचे मीटर सदोष असल्याचा किंवा मीटरमध्ये छेडछाड केल्याचा संशय व्यक्त केला आहे. अशा लोकांचे मीटर त्वरित बदलणे आवश्यक आहे. अशा वीजचोरांमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा अनेकदा खंडित होत आहे. त्यांना लाइन ट्रिपिंग आणि नेटवर्क बिघाडाचा सामना करावा लागतो.
टोरंट कंपनीने नुकतीच मीटरमध्ये छेडछाड आणि वीज चोरीविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून पोलिसांत वीजचोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. या कारवाइमुळे आता वीजचाेरांचे धाबे दणाणले आहेत.
तीन वर्षे कारावास किंवा दंडाची तरतूदवीजचोरी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करीत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. विद्युत कायदा, २००३ नुसार, वीजचोरी हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंडाची तरतूद असल्याची माहिती कंपनीने दिली.