ठाणे : अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन टिका झाल्यानंतर अखेर आता कारवाईला सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यातही अनाधिकृत बांधकामांमध्ये अग्रेसर असलेल्या कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील बांधकामांकडे ठाणेकरांच्या नजरा खिळल्या आहेत. अशातच सोमवारी कळवा प्रभाग समितीच्या वतीने शास्त्री नगर भागातील प्लींथच्या दोन अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच एक बैठक घेऊन अनाधिकृत बांधकामांना वीज, पाणी देऊ नका असे आदेश दिले आहेत. तसेच अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करा असेही सांगितले आहे. परंतु अनाधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणाºया अधिकाºयांवर देखील कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानुसार अतिक्रमण विभाग आता उशीराने का होईना खडबडून जागा झाला आहे. या विभागाच्या माध्यमातून अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. प्रत्येकाला जबाबदारी सोपविण्यात आली आहे.त्यातही अनाधिकृत बांधकामांच्या प्राथमिक सर्व्हेत कळवा, मुंब्रा आणि दिव्यातच अधिक बांधकामे उभी राहत असल्याचे दिसून आले आहे. तसेच येथील स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड तसेच काही दक्ष नागरीकांनी देखील कळवा, मुंब्य्रातील अनाधिकृत बांधकामांचे छायाचित्रही पालिका आयुक्तांना सादर केले होते. परंतु त्यानंतर आता उशीराने का होईना कारवाईला सुरुवात झाल्याचे दिसत आहे.कळव्यातील शास्त्री नगर भागात नव्याने अनाधिकृत इमारतींची कामे सुरु झाली होती. याची तक्रार प्रभाग समितीला प्राप्त होताच, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांनी घटनास्थळी जाऊन येथील बांधकामावर कारवाई केली. याठिकाणी प्लींथचे बांधकाम सुरु होते, ते पूर्णपणे काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कळव्यातील दोन अनाधिकृत बांधकामांवर कारवाई
By अजित मांडके | Published: September 25, 2023 5:53 PM