ठाणे : ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही समाधानाची बाब मानली जात आहे. परंतु, आता कंटेनमेंट झोनमधूनही कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महापालिकेने अॅक्शन प्लान तयार केला आहे. त्यानुसार, या भागाचे येत्या चार दिवसांत पूर्णपणे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक कंटेनमेंट झोनमध्ये २० ते ३० पथके तयार करून घरोघरी जाऊन सर्व नागरिकांची तपासणी सुरू केली आहे.
ठाण्यात झोपडपट्टीतील कोरोना रोखण्यात अद्यापही महापालिकेला यश आलेले नाही. त्यातल्या त्यात लोकमान्य-सावरकरनगर भागात रुग्णवाढीची संख्या मागील काही दिवसांत घटली आहे. या भागांत महापालिका घरोघरी जाऊन तपासणी करून एखाद्याला ताप असेल किंवा आणखी काही त्रास होत असेल, तर त्याला लगेचच क्वारंटाइन करून तीन ते चार दिवसांनी त्याची कोरोना चाचणी करीत आहे. यामुळे रुग्णवाढीचा दर हा ४० ते ५० वरून २० पर्यंत खाली आला आहे. परंतु वागळे, कोपरी, नौपाडा, मुंब्रा आणि आता उथळसर भागात बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे लोकमान्यनगर भागात जो अजेंडा राबविला, तोच या प्रभाग समित्यांमध्येही राबविला जाणार आहे.सहायक आयुक्तांवर विशेष जबाबदारीठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांशी चर्चा करून कंटेनमेंट झोनमध्ये येत्या चार दिवसांत प्रत्येक घराची तपासणी करण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या उपायुक्तांनी हा अॅक्शन प्लान तयार केला असून त्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत आता २० ते ३० पथके सज्ज केली असून ती थर्मल स्कॅनिंग करून इतर तपासणीही करणार आहेत. यानुसार, प्रत्येक सहायक आयुक्ताला विशेष जबाबदारी दिली आहे. तसेच या भागांमध्ये फिव्हर क्लिनिक उभारून त्याठिकाणीदेखील तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी स्थानिक नगरसेवकांची मदत घेऊन प्रत्येक घर पिंजून काढले जात आहे.13,270 नागरिकांची तपासणीठाणे महापालिकेने ५ जूनपर्यंत नऊ प्रभाग समितीअंतर्गत १३,२७० नागरिकांची तपासणी केली असून यातील ५८ जणांत तापाची लक्षणे आढळल्याने २० नागरिकांना होम क्वारंटाइन करून आठ जणांना कळवा रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच २८ नागरिकांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात दाखल केल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.