उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस वसाहतीवर चक्क सनद दिल्याचा प्रकार पालिकेचे विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. वसाहतीवरील पाडकाम कारवाईचा प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितल्यावर, पोलिसांनी प्रांत कार्यालयात धाव घेऊन कारवाई थांबवण्याची विनंती केली. या प्रकाराने सनद घोटाळ्याची चर्चा रंगून सनदच्या चौकशीची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं.-४ येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या बाजूला व एनसीटी शाळेसमोर पोलीस वसाहत आहे. एनसीटी स्कूलसमोरील बैठ्या चाळींची निवासस्थाने धोकादायक झाल्याने, अनेक वर्षांपासून ती बंद आहेत. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याशेजारील तीन बहुमजली इमारती धोकादायक घोषित झाल्यावर, त्या खाली करण्यात येऊन त्यांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती तत्कालीन पोलीस उपायुक्तांनी दिली होती. सकाळी १० वाजता एनसीटी स्कूलसमोरील बंद पोलीस वसाहतीवर पाडकाम कारवाई सुरू होती. त्यावेळी तेथून जाणाऱ्या विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी चौकशी केली असता वसाहतीच्या जागेवर भोईर नामक व्यक्तीला सनद मिळाल्याचे कळले. या प्रकाराने बोडारे यांना धक्का बसला. हा प्रकार त्यांनी विठ्ठलवाडी पोलिसांसह पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांना सांगितला.
विठ्ठलवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोमे यांनी पवई चौक येथील प्रांत कार्यालयात धाव घेऊन पोलीस वसाहतीवरील पाडकाम कारवाईचा प्रांताधिकारी जगजितसिंग गिरासे यांना जाब विचारून कारवाई थांबवण्याची विनंती केली. त्यांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता, वसाहतीवर चक्क सनद दिल्याचे उघड झाले. धनंजय बोडारे यांच्या सतर्कतेमुळे बंद पोलीस वसाहती पाडकाम कारवाईपासून वाचल्या असून प्रांताधिकारी कागदपत्रांची चौकशी करून पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती भोमे यांनी पत्रकारांना दिली. शेवाळे यांच्याशी संपर्क केला असता, ही जागी पोलीस वसाहतीची आहे. बैठ्या चाळी धोकादायक झाल्याने, वसाहत बंद ठेवल्याची माहिती देऊन पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले.
सनद म्हणजे काय?देशाच्या फाळणीच्या वेळी विस्थापित सिंधी समाजाला कल्याण शहराजवळील लष्करी छावणीतील बरॅक व खुल्या जागेत वसवण्यात आले. या वसाहतीला उल्हास नदीवरून उल्हासनगर नाव देण्यात आले. सन १९६० पूर्वी ज्यांचा खुल्या जागेवर ताबा अथवा कब्जा आहे, त्यांना प्रांत कार्यालयाकडून सनद म्हणजे मालकी हक्क दिला जातो. मात्र, भूमाफियांनी धनदांडगे, प्रांत कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांना हाताशी धरून शहरातील अनेक आरक्षित भूखंड व खुल्या जागांवर ताबा दाखवून बनावट सनद मिळवली. यामध्ये कोट्यवधींचा व्यवहार होत असून प्रांत कार्यालयातील अनेकांना सनदप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
सनदप्रकरणी चौकशीची मागणीप्रांत कार्यालयाने पर्यायी जागा म्हणून पोलीस वसाहतीचा भूखंड, कॅम्प नं.-४, संतोषनगर येथील जुन्या सिंधी आयटीआयचा चार एकरचा भूखंड, कॅम्प नं.-५, कुर्ला कॅम्प येथील एमजेपीचा वसाहतीच्या जागेसह भूखंड, गोलमैदान व कॅम्प नं.-५ येथील पोलीस आरक्षित वसाहत भूखंड, अॅम्बोसिया हॉटेलशेजारील भूखंड तसेच अनेक खुल्या जागा पर्यायी जागांच्या नावाखाली धनदांडग्यांना सनद दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या प्रकाराने प्रांत कार्यालय वादात सापडले असून सनद प्रकाराच्या चौकशीची मागणी धनंजय बोडारे यांनी केली आहे.