मीरारोड - भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानकालगत प्रवाशांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर रिक्षाचालकांकडून अतिक्रमण होत आहे. अतिक्रमण करणाऱ्या या रिक्षांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून रस्ता मोकळा केला.
भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने वाहनांची गर्दी असते. रोज हजारो प्रवासी येथून ये-जा करतात. येथे रस्ता अरुंद असून त्यात महापालिकेने राजकारण्यांच्या आग्रहाखातर ८ कोटी रुपयांचे सुशोभीकरणचे काम काढून लोकांच्या त्रासात भर टाकली आहे.
या सुरू असलेल्या कामामुळे रेल्वे स्थानकात दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन देखील मदतीसाठी पोहोचू शकत नाही अशी स्थिती आहे. ‘लोकमत’ने याबाबत गेल्या वर्षां पासून सातत्याने बातम्या दिल्यानंतर एका बाजूने बांधकाम काढून टाकत रेल्वे स्थानकात जाण्यास डांबरी रस्ता पालिकेने बनवला. पण त्यालादेखील रिक्षा, फेरीवाले आणि बेकायदा पार्किंगच्या अतिक्रमणचा विळखा पडला आहे. त्यामुळे प्रवाशांना ये जा करणे त्रासाचे बनले आहे.
शनिवारी डांबरी रस्त्यावर रिक्षाचालकांनी चालवलेल्या अतिक्रमणाची तक्रार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्याकडे गेली. त्यांनी वाहतूक पोलीस पाठवून रिक्षा काढायला लावून रस्ता मोकळा केला. रिक्षाचालकांनी मनमानी केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे भामे यांनी सांगितले.