- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील कल्याण ते बदलापूर रस्ता पुनर्बांधणीच्या आड येणाऱ्या दुकानावर सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या अतिक्रमण पथकाने बुधवारी पाडकाम कारवाई केली. तसेच रस्त्याचे बांधकाम जोरात सुरू असून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीची समस्या निकाली लागणार आहे.
उल्हासनगराच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते बदलापूर रस्त्याचे ४ वर्षांपूर्वी १०० फुटी रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरणात ९०० पेक्षा जास्त दुकाने व घरे बाधित झाली असून त्यापैकी २५० दुकाने पूर्णतः बाधित झाली. दुकानदारांनी पर्यायी जागेची मागणी महापालिकेकडे लावून धरल्यावर, इंदिरा गांधी भाजी मार्केट येथे पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला. मात्र अद्यापही बाधित दुकानदाराला पर्यायी जागा देण्यात आली नसल्याची प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली. रस्त्याचे रुंदीकरण सुरू असताना काही दुकानदारांनी पर्यायी जागेसाठी न्यायालयाचे दार ठोठावले. त्यामुळे रस्ता पुनर्बांधणीचे काम रखडले होते.
न्यायालयात गेलेल्या दुकानाची जागा सोडून इतर ठिकाणी रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अनेकांनी विनापरवाना बहुमजली बांधकामे केली. त्यावर कारवाई करण्याची मागणी होत असून अश्या बहुमजली बांधकामाला अद्याप वाढीव मालमत्ता कर लागू केली नसल्याने, कोट्यवधी रुपयांची नुकसान महापालिकेचे होत आहे. रस्त्याच्या आड येणाऱ्या दुकानावर बुधवारी गणेश शिंपी यांच्या पथकाने कारवाई केली. तसेच विजेचे खांब, रोहित्र व झाडे हेही हटविले आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. तसेच रस्त्याच्या आड येणाऱ्या बांधकामसह झाडे, विजेचे खांब व रोहित्र हटविणार असल्याची महिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली .
आयुक्तांनी घेलली व्यापाऱ्यांची बैठक कल्याण ते बदलापूर रस्ता बांधणीच्या अडसर ठरलेल्या व पर्यायी जागेसाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावलेल्या काही बांधकामधारका सोबत गेल्या महिन्यात आयुक्तांनी बैठक घेतली. व्यापाऱ्यांनी आयुक्तांच्या आवाहनाला सकारात्मक निर्णय घेतल्यास, रस्ता पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा होणार आहे.