लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : बदलापूर पालिकेने बुधवारपासून सुरू केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईत शहराच्या पूर्व-पश्चिम भागात उभारण्यात आलेल्या शेकडो शेड्स, टपऱ्या तसेच दुकानांच्या काही गाळ्यांवरही कारवाई करण्यात आली. दुसऱ्या दिवशी बदलापूर पश्चिम बाजारपेठेत ही कारवाई करताना झालेल्या विरोधामुळे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनाही रस्त्यावर उतरावे लागले. अतिक्रमण करून उभारलेले शेड काढल्यानंतरच ही मोहीम संपली. बदलापूर बाजारपेठेत नोव्हेंबर महिन्यात कारवाई करण्यात आल्यानंतर काही दुकाने नव्याने बांधण्यात आली आहेत. यापैकी काही बांधकामांवर कारवाई केल्यानंतर दुकानदारांनी कारवाईस विरोध दर्शवला. अधिकारी व दुकानदार यांच्यात बराच वेळ चर्चा होऊनही मार्ग निघत नसल्याने अखेर नगराध्यक्ष वामन म्हात्रे या ठिकाणी आले. दुकानदारांच्या म्हणण्यानुसार त्यांना मार्किंग देण्यात यावे व त्यानंतर ते मार्किंगपर्यंतचे बांधकाम स्वत:हून तोडतील, असा मार्ग काढण्यात आला. त्यामुळे बाजारपेठेतील पुढील दुकानांवरील कारवाई थांबवण्यात आली. इतर काही बांधकामांवर मात्र कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या वेळी स्वत: नगराध्यक्ष रस्त्यावर उतरल्याचे पाहून फेरीवाल्यांची एकच पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांत अतिक्र मण करून अनधिकृतपणे उभारलेल्या शेडवर कारवाईसाठी पालिकेच्या वतीने बुधवारपासून दोनदिवसीय धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. दिवसभर कारवाईचा जोरया मोहिमेंतर्गत बुधवारी पूर्वेकडील बदलापूर स्टेशन ते कात्रप परिसरात अनेक दुकाने व कार्यालयांच्या अनधिकृत शेड भुईसपाट करण्यात आल्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास कडक पोलीस बंदोबस्तात सुरू झालेली ही कारवाई संध्याकाळपर्यंत सुरू होती.
बदलापुरात सलग दुसऱ्या दिवशी कारवाई
By admin | Published: June 02, 2017 5:26 AM