ठाणे : ठाणे महापालिकेच्या महासभेत नाकारण्यात आलेले प्रस्ताव पुन्हा आर्थिक तरतुदीसाठी ठेवण्यात आल्याने पालिकेच्या रुपेश पाडगावकर या उपभियंत्याला चांगलेच भोवले आहे. त्यामुळे या उपअभियंत्यावर ठाणे महापलिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.
ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभागामध्ये उपअभियंता असलेल्या पाडगावकर यांच्याकडे बजेट व्यवस्थापनाचीही जबाबदारी सोपवण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडून आर्थिक स्थितीप्रमाणे कामाचे प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, कामांची यादी तयार करून त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येते. परंतु संबंधित उपअभियंत्यांनी या कामांव्यतिरिक्त इतर कामांना अर्थसंकल्पीय तरतुद केली.त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या ठरावाच्या अंमलबजावणीस अडथळा निर्माण झाला आहे.
लोकप्रतिनिधींनीही त्याबद्दल संताप व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. तर शुक्रवारच्या स्थायी समिती बैठकीमध्येही या संदर्भात चर्चेमध्ये संबंधित कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्याला सर्वसाधारण सभेच्या ठरावाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून त्याना तडकाफडकी निलंबित केले.