ठाणे: बेकायदेशीर मद्य विक्री करणाऱ्या ठाण्यातील २५ हॉटेल आणि ढाबे चालकांवर पोलिसांनी गेल्या आठ दिवसांत कारवाई केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील यांनी बुधवारी दिली. बेकायदा मद्य विक्री न थांबल्यास ३१ डिसेंबर रोजी हॉटेल बंद ठेवण्याचा इशारा ठाण्यातील अधिकृत परवानाधारक हॉटेल चालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्राद्वारे दिला होता.
परवाना नसतानाही काही हॉटेल तसेच ढाबे चालक हे ग्राहकांना दारू उपलब्ध करून देतात, अशा तक्रारी हॉटेल चालकांनी ठाण्याच्या पोलिस आयुक्तांकडे तसेच मुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या. अशा हॉटेलवर कारवाईसाठी त्यांनी बंदचे हत्यार उपसण्याचा इशारा दिला हाेता. याची गांभीर्याने दखल घेत येऊर, घाेडबंदर रोड, कोलशेत रोड या परिसरात विशेष मोहीम राबवून पोलिसांनी गेल्या आठ दिवसांमध्ये बेकायदेशीरपणे मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली.
परिमंडळ एक ठाणे शहरातील ठाणेनगर, नौपाडा आणि कळवा या पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक तर डायघर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तीन अशा सहा हॉटेल चालकांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ - ई अंतर्गत कारवाई केली. वागळे इस्टेट परिमंडळांतर्गत वर्तकनगर आणि कापूरबावडी पोलिस ठाण्यांतर्गत प्रत्येकी सहा आणि कासारवडवली पोलिसांनी सात अशा १९ हॉटेल चालकांवर ही कारवाई केली. ही मोहीम यापुढेही राबविली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.