ठाणे: ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने व्यापक कारवाई सुरू असून, गुरुवारी शहरातील विविध भागांतील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे सामान जप्त करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई झाली असून यापुढेही ती सुरूच राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली.
कारवाईअंतर्गत दिवा प्रभाग समितीमधील रिव्हरवूड पार्क मेन गेट तसेच रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच पदपथावरील अतिक्रमण हटवले. यामध्ये अनधिकृत शेड, तीन टपऱ्या, तीन हात गाड्यांचा समावेश आहे. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील बाळकूत कशेळी रोडवरील १७ हातगाड्या जप्त केल्या. नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील अलोक हॉटेल, गावदेवी तीन हात नाका, राममारुतीरोड, मासुंदा तलाव, स्टेशन परिसर, जुनी महापालिका, सुभाष पथ, जांभळी नाका, कोर्ट नाका येथील फेरीवाले हटवून त्यांचे सामान जप्त केले. लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीमधील वर्तकनगर नाका, रामचंद्रनगर, काजुवाडी या परिसरांतील हातगाडी, फेरीवाले हटविण्यात आले.
उथळसरमध्ये तीन टपऱ्या हटविण्यात आल्या. वागळे प्रभाग समितीमध्ये १३ ठिकाणी कारवाई झाली. ही कारवाई अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त शंकर पाटोळे, संतोष वझरकर, अलका खैरे, महेश आहेर आणि विजयकुमार जाधव यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने केली.
..........