Badlapur School Case ( Marathi News ) : बदलापूर शहरातील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर काल शहरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. विद्यार्थ्यांच्या पालकांसह शहरातील नागरिकांनी एकत्र येत आधी शाळेच्या प्रवेशद्वारावर आणि नंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर आक्रमक आंदोलन केलं. आंदोलक थेट रेल्वे रुळावर उतरल्याने मंगळवारी मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत २६ आंदोलकांना अटक केली असून तब्बल ३०० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बदलापूर शहरातील आदर्श महाविद्यालयातील शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलींवर साहेतील सफाई कामगाराने ११ आणि १२ ऑगस्टला अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर पीडित मुलीच्या आईला पोलीस ठाण्याच्या परिसरारात १२ तास उभे करुन ठेवण्यात आले होते. त्यामुळे बदलापूरकर संतप्त झाले आणि तीव्र आंदोलन छेडण्यात आले. शाळेत तोडफोड केल्यानंतर काही आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला, १० वाजता बदलापूर रेल्वे स्थानकातील रेल्वे वाहतूक आंदोलकांनी रोखली. परिणामी, अंबरनाथ स्थानकापुढील कर्जत, खोपोलीकडील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. एकीकडे शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु होते, तर दुसरीकडे रेल रोको सुरू झाल्यामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आदोलकांशी चर्चा केली. तासभराच्या चर्चेनंतरही आंदोलन मागे घेतले जात नसल्याने पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास लाठीमार केला. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगड भिरकावले.
दरम्यान, बदलापूर रेल्वेस्थानकात आंदोलन करणाऱ्या २६ जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यात आठ महिलांचा समावेश आहे. तसेच ३०० अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्यांची ओळख पटवण्यात येत असल्याचे कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांटे यांनी 'लोकमत'ला सांगितले.
५० लोकल फेऱ्याही केल्या रद्द, २४ मेल-एक्स्प्रेस वळवल्या बदलापूर ते कर्जत-खोपोली अपडाऊन मार्गावरील ५० हून अधिक लोकल रद्द करण्यात आल्या. तर २४ मेल-एक्सप्रेस ठाणे, दिवा, पनवेल मार्गे वळवल्या. मंगळवारी सकाळी ९:३० पासून सर्व गाड्या खोळंबल्या, संध्या. ५ वाजेपर्यंत १२ मेल/ एक्सप्रेस वळवल्या. कल्याण ते कर्जतदरम्यान ५५ बस चालवण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. कोयना एक्स्प्रेस बदलापूर ते कल्याण व नंतर दिवा-पनवेल मार्गे कर्जतकडे पाठवली.