भिवंडी: भिवंडी शहरातील गरीब झोपडपट्टी विभागात मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य असलेले खाद्यपदार्थ विक्री केले जात असून त्याबाबत अनेकदा तक्रारी होत असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवारी मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका दुकानावर कारवाई करीत ७१ हजारांचे साहित्य जप्त केले आहे.
अन्न व औषध प्रशासनातील अन्न निरीक्षक माणिक जाधव व रामलिंग बोडके यांना भिवंडी शहरातील जैतूनपुरा येथील शमीम अपार्टमेंट येथे सुरू असलेल्या सुपरमार्केट दुकानात अब्दुल हमीद अब्दुल कय्युम अन्सारी हे मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य साहित्य विक्री केले जात असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी छापा टाकला. त्या दुकानात गार्डन नायलॉन शेव,ब्ल्यू बर्ड आईस्क्रीम मिक्स,क्रीम बिस्कीट्स,मोन्याको बिस्कीट्स,लिज्जत पापड, चहा पावडर, शाही पनीर यांसह अनेक खाद्य पदार्थ मुदतबाह्य होऊनही विक्री करीत असल्याचे आढळून आले. अन्न निरीक्षकांनी या कारवाईत तब्बल ७१ हजार ७५० रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.हा सर्व साठा पालिकेच्या परवानगीने डंपिंग ग्राउंड वर नष्ट केला जाणार आहे अशी माहिती अन्न निरीक्षक माणिक जाधव यांनी दिली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी शहरात प्रशासनाच्या वतीने नियमित कारवाई करीत असल्याची माहिती अन्न निरीक्षक रामलिंग बोडके यांनी दिली. आठवड्याभरात शहरातील रांजनोली येथील अमंत्रा कॉम्प्लेक्स येथील जिगर भानुशाली यांच्या जिया एंटरप्रायझेस दुकानांवर कारवाई करीत १२ हजार ५३० रुपयांचा मुदतबाह्य अन्न पदार्थांचा साठा जप्त केला. तर कोणार्क अर्केड येथील रिलायन्स रिटेलच्या स्मार्ट पॉइंट दुकानातील खाद्यपदार्थांच्या साहित्याची तपासणी केली.
नागरिकांनी स्वस्त मिळते म्हणून खाद्य पदार्थ खरेदी करण्यापूर्वी खाद्यपदार्थ हे वापरण्यास योग्य असल्याची खात्री करून घ्यावे व आपल्या आरोग्याशी खेळू नये असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .