भिवंडी: शहरात तेल विक्री करणाऱ्या दोन दुकानात अदानी विल्मर लिमिटेड या कंपनीच्या नावाने बनावट तेल विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला असून कंपनीने दिलेल्या तक्रार वरून नारपोली पोलिसांनी दोघा जणां विरोधात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार धामणकर नाका परिसरात सौराष्ट्र ऑईल डेपो व गणेश ऑईल डेपो अशी दोन तेल विक्रीची दुकाने काही अंतरावर आहेत.अदानी विल्मर कंपनीचे प्रतिनिधी भिवंडी शहरात आपल्या कंपनीच्या माला बाबत सर्वेक्षण करीत असताना त्यांना सौराष्ट्र ऑईल डेपो मध्ये अनवर चिमण शहा दिवाण हे अदानी विल्मर कंपनीचा ब्रँड असलेले बनावट तेल विक्री करताना आढळून आले. तर गणेश ऑईल डेपो मध्ये राजु भिमराय पुजारी हे सुध्दा अशाच पद्धतीने या ब्रँड च्या नावाने बनावट तेल विक्री करताना आढळून आले .
या बाबत नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार देऊन या दोन्ही ठिकाणी चौकशी केली असता एका दुकानात १ लाख ५२ हजार २२५ रुपये व दुसऱ्या दुकानात ४३ हजार २५० रुपये असा एकूण १ लाख ९५ हजार ४७५ रुपयांचा बनावट तेल साठा जप्त केला असून अदानी विल्मर कंपनीचा बनावटीकरण केलेला मुद्देमाल विक्री करीत असल्या बाबत दोन्ही दुकांदारांनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोळी हे करीत आहेत.
भिवंडी बनावट तूप,जिरे त्यानंतर तेल अशा बनावट वस्तूंची विक्री व साठवणूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने अन्न व औषध प्रशासनासह पोलीस यंत्रणेच्या कर्तव्यदक्षतेवर नागरिकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे.