सदानंद नाईक उल्हासनगर : ठाकरेसेनेच्या इशाऱ्यानंतर पुणे पोलिसांच्या धर्तीवर महापालिकेने १७ सेक्शन परिसरातील चांदनी व राखी बारच्या अवैध बांधकामावर मंगळवारी पाडकाम कारवाई केली. तसेच इतर बारच्या अवैध बांधकामाची चौकशी करण्यात येत असल्याचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिले आहे.
उल्हासनगर महापालिकेने पुणे पोलिसांच्या धर्तीवर गेल्या महिन्यात दोन बारच्या अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई केल्यावर, सत्ताधारी पक्षाकडून बुलडोझर बाबांचे पोस्टर्स झळकले होते. तसेच अवैध पानटपऱ्यावरही महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. मात्र त्यानंतर कारवाई थंड पडल्याने, ठाकरेसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह आयुक्त अजीज शेख यांची भेट घेऊन अवैध बारवर कारवाईची मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर महापालिका अतिक्रमण विभागाला जाग येऊन, विभागाच्या पथकाने मंगळवारी १७ सेक्शन येथील चांदनी व राखी बारच्या अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई केली. या कारवाईने बार व हॉटेल चालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बारच्या अवैध बांधकामावर कारवाई करण्याची मागणी शहरातून होत आहे.
पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख यांनी काही बारच्या अवैध बांधकामाबाबत लेखी पत्र दिले होते. त्यानंतर आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभाग प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने यापूर्वी दोन बारच्या बेकायदेशिर बांधकामावर व मंगळवारी चांदणी व राखी बारच्या बेकायदेशीर बांधकामावर पोलीस संरक्षणात पाडकाम केली. शहरातील इतर बारमालकांना देखिल नोटीस बजावण्यात आल्याची माहिती शिंपी यांनी दिली. सदर बारमालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरु असून पडताळणीअंती ज्या बारमध्ये अवैध बांधकाम आढळून येईल त्यांच्यावर पाडकाम कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अजीज शेख यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहे.