ठाणे : आरटीआय कार्यकर्त्यांच्या बाबतीत केलेल्या अभ्यासात काही महत्त्वाच्या बाबी निर्दशनास आल्या आहेत. काही कार्यकर्ते माहिती मागवतात, तिच्या आधारे दुसराच न्यायालयात याचिका दाखल करतो. काही वेळेस ती मागे घेतली जाते. काही जण ठराविक विभागात एकाच विषयासाठी वारंवार अर्ज करीत असल्याचेही निदर्शनास आल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी झालेल्या महासभेत दिली. त्यामुळे पोलिसांकडून याची तपासणी करून कायदेशीरबाबी तपासून आरटीआय कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.विधानसभेत झालेल्या आरटीआय कार्यकर्त्यांच्या लक्षवेधीच्या अनुषंगाने बुधवारी ठाणे महापालिकेच्या महासभेतदेखील राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या मुद्याला हात घातला. आरटीआय कार्यकर्त्यांना पालिकेत काही अधिकारी अशा कार्यकर्त्यांचे जास्त मनोरंजन करतात, त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई कशा पद्धतीने होऊ शकते याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कितपत माहिती द्यावी, कोणती देऊ नये, एक कार्यकर्ता किती वेळा ती मागतो, याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मतही काही नगरसेवकांनी व्यक्त केले. तर या कार्यकर्त्यांना बाजूची खुर्ची देऊन नगरसेवकांना ताटकळत ठेवण्याचे प्रकारही काही अधिकाºयांकडून सुरू असल्याचे नगरसेवक अशोक वैती यांनी निर्दशनास आणले.दरम्यान विधानसभेत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेतदेखील यातील काही बाबी सभागृहाच्या निदर्शनास आणल्या. प्रशासनाच्या वतीने मागील महिनाभर अशा आरटीआय कार्यकर्त्यांचा अभ्यास सुरू होता. त्यातून काही महत्त्वाच्या बाबी निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखादा व्यक्ती वारंवार एका विभागात एकाच विषयासाठी प्रश्न विचारतात, माहिती घेणारे आणि न्यायालयात जाणारे हे दुसरेच असतात, काही व्यक्तीतर एकाच विभागात सुमारे ६० हून अधिक अर्ज टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे, न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर, कालांतराने ती मागेही घेतली जाते. त्यामुळे अशांच्या बाबतीत शंका उपस्थित राहत आहेत.आरटीआयअंतर्गत अर्ज करण्याबाबत माझा विरोध नसल्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. परंतु, अशा पद्धतीने एकाच विभागात अर्ज करून त्रास देणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे यावर पोलिसांशी सल्लामसलत करून, कायदेशीर बाबींचा तपास करून नियमानुसार कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.
नियम तपासून आरटीआय कार्यकर्त्यांवर कारवाई, आयुक्तांचे महासभेत संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 1:11 AM