ठाणे -मागील काही महिने थांबलेली रस्ता रुंदीकरणाची कारवाई बुधवार पासून पुन्हा एकदा सुरु झाली आहे. दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील वाय जंक्शन ते कल्याणफाटा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम बुधवार पासून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत सुरु झाले. या ठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारी येथील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु यामुळे येत्या काही दिवसात हा रस्ता दोन्ही बाजूला ६० मीटरचा होणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे. या ४ किमीच्या मार्गावरील १९० कुटुंबांचे पुनर्वसन बाजूलाच असलेल्या दोस्तीच्या रेंटलच्या घरांमध्ये करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून येथील रस्त्याच्या दुतर्फा ही कारवाई पोलीस बंदोबस्तात सुरु झाली. यावेळी आयुक्तांसमवेत अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले, उपायुक्त संदीप माळवी आदींसह इतर पालिकेचे अधिकारी आणि अतिक्रमण विभागाचे पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. वाय जंक्शन ते कल्याणफाटा हा सुमारे ४ किमीचा रस्ता आहे. परंतु सध्या या रस्त्याच्या दुतर्फा वाहतुक कोंडी होतांना दिसत आहे. तसेच येत्या काही दिवसात याठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे संभाव्य वाहतुक कोंडी लक्षात घेऊन ही कारवाई हाती घेण्यात आल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या हा रस्ता २५ ते ३० मीटरच्या आसपास आहे. परंतु रुंदीकरणानंतर हा रस्ता ६० मीटरचा होणार आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असलेली तळ अधिक चार ते सात मजल्याच्या ६ इमारती, ३० बांधकामे, भारत गिअर कंपनीचा गेट, २० ते २५ गॅरेजवाले व इतर व्यावसायिक आदींवर यावेळी हातोडा टाकण्यात आला. तर या भागातील १९० कुटुंबांचे जवळील दोस्तीच्या रेंटलच्या घरात केले जाणार आहे. रस्त्याचे रुंदीकरण जरी पालिका करणार असली तरी रस्त्याचे काम हे एमएमआरडीए मार्फतचे केले जाणार आहे.चौकट - ऐरोली ते काटई नाका पर्यंतच्या होऊ घातलेल्या उन्नती मार्गातील ६० मीटरचा भाग हा येथूनच जात आहे. परंतु आता येथील रहिवाशांची चर्चा झाली असून त्यांनी जमीन हस्तांतरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता हा मोठा प्रश्न सुध्दा सुटणार असल्याचा आशावाद यावेळी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला.
मुंब्य्रातील वाय जंक्शन ते कल्याणफाटा रस्ता रुंदीकरणाची कारवाई सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 4:40 PM
दिवा प्रभाग समिती हद्दीतील वाय जंक्शन ते कल्याणफाटा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम महापालिकेने अखेर सुरु केले आहे. या रुंदीकरणात बाधीत होणाऱ्या १९० कुटुंबांचे पुनर्वसनसुध्दा दोस्ती रेंटलच्या घरात केले जाणार आहे.
ठळक मुद्देवाहतुक कोंडीतून होणार सुटकारस्ता दोन्ही बाजूला ६० मीटरचा होणार