ठाणे - एका फलाटावरून दुसऱ्या फलाटापर्यंत पोहोचण्यासाठी बिनदिक्कत रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार ठाणे स्थानकात वाढले आहेत. २०१७ ते २०१९ या कालावधीत ठाणे रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी सुमारे साडेतीन हजार प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडताना पकडून त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती ठाणे आरपीएफ पोलिसांनी दिली. ठाणे स्थानकातील कल्याण दिशेकडील फलट क्रमांक दोन व चारच्या दरम्यानचा पूल बंद असल्याने रेल्वे प्रशासन हेही रुळ ओलांडण्याच्या घटनांकरिता तेवढेच जबाबदार असल्याची प्रवाशांची भावना आहे.ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातून मध्य रेल्वे आणि ट्रार्न्स हार्बर यांच्या लोकलसह एक्स्प्रेस गाड्या दररोज धावतात. ठाणे रेल्वे स्थानकात तब्बल दहा फलाट आहेत. एका फलाटाहून दुसºया फलाटावर जाण्यासाठी पादचारी पुलांचा वापर करण्यापेक्षा प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात व जीव धोक्यात घालतात. अशा प्रवाशांविरोधात ठाणे आरपीएफ पोलिसांमार्फत नेहमी कारवाई केली जाते तरी काही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडण्याची खोड सोडत नसल्याचे दिसत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात मागील तीन वर्षात ३ हजार ३१३ जणांना पकडून त्या प्रवाशांकडून १०० रूपयांपासून ३०० रूपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली गेली आहे. २०१७ मध्ये १ हजार १५७ जणांना रुळ ओलांडताना आरपीएफ पोलिसांनी पकडले. २०१८ मध्ये हे प्रमाण अर्ध्यावर आले होते. त्या वर्षात ६०१ जणांना पकडले होते. ही बाब आरपीएफ पोलिसांसाठी आणि रेल्वे प्रशासनासाठी सुखद बाब होती. परंतु २०१९ मध्ये प्रमाण दुपटीने वाढले. या वर्षात १ हजार ५५५ जणांना पकडण्यात आल्याची नोंद आहे. रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वे अपघात मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांवर दररोज ठाणे आरपीएफ पोलिसांमार्फत कारवाई केली जात आहे. तरीसुद्धा हे प्रमाण कमी होताना दिसत नसल्याचे आरपीएफ पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.रेल्वे पुलांची कामे रखडल्याचा परिणाम : ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील रेल्वे पूल दीर्र्घकाळ दुरुस्तीकरिता बंद केलेला आहे. डोंबिवलीतील कल्याण दिशेकडील पूल दीर्घकाळ बंद होता. अलिकडेच तो पाडून टाकला. रेल्वे प्रशासन वाढत्या गर्दीकरिता पूल उपलब्ध करुन देत नाही. दुरुस्तीच्या नावाखाली पूल महिनोनमहिने बंद ठेवले जातात. त्यामुळे रुळ ओलांडताना होणाºया अपघाताकरिता आरपीएफ, रेल्वे पोलीस, रेल्वे प्रशासन हेही तेवढेच जबाबदार असल्याची प्रवाशांची भावना आहे.
रेल्वे रूळ ओलांडताना साडेतीन हजारांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 2:03 AM