उल्हासनगर : कॅम्प नं-५ परिसरातील अवैध व विना परवाना लावलेल्या पोस्टर्स व बॅनर्सवर सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी धडक कारवाई केली. गेल्या आठवड्यात बॅनर्स लावण्यावरून दोन माजी नगरसेवकाचा राडा गाजला असून परस्परविरोधी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगरातील विविध भागात अवैध व विना परवाना पोस्टर्स, बॅनर्स लावले जात असून महापालिका अतिक्रमण विभाग वारंवार कारवाई करते. मात्र राजकीय नेते महापालिकेच्या नाकावर टिचून विनापरवाना पोस्टर्स व बॅनर्स लावत असल्याने, त्यांच्यापुढे महापालिका प्रशासन हतबल झाल्याचे चित्र शहरात आहे. कॅम्प नं-५ कैलास कॉलनी परिसरात माजी नगरसेवक प्रधान पाटील यांच्या समर्थकांचे वाढदिवसा निमित्त लावलेले बॅनर्स माजी नगरसेवक विजय पाटील यांनी फाडले. असा आरोप प्रधान पाटील यांना येऊन, त्यांनी याबाबत विजय पाटील यांना जाब विचारताच दोघांमध्ये भररस्त्यात राडा झाला. दोघांतील वाद हिललाईन पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले. विना परवाना बॅनर्सवर वेळीच कारवाई झाली असतीतर, दोघात राडा झाला नसता. असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यां पथकाने शुक्रवारी दुपारी लोखंडाच्या खांबाला लावलेले बॅनर्स व पोस्टर्सवर धडक कारवाई करून बॅनर्स जप्त करण्यात आले. कॅम्प नं-५ सह शहरातील इतर अवैध व विनापरवाना लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर गुन्हा दाखल करा. अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.