नवी मुंबई : घणसोलीमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आठवडी बाजारावर महापालिकेने रविवारी कारवाई केली. रोडवर अतिक्रमण करून हा बाजार सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होवून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.येथील हनुमान मंदिर ते सद्गुरू हॉस्पिटल ते गावदेवी चौकापर्यंत प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरत असतो. चार ते पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. कपड्यांपासून सर्व प्रकारच्या वस्तू विक्री करणारे फेरीवाले याठिकाणी व्यवसायासाठी येतात. वास्तविक आठवडे बाजाराची यंत्रणा राबविण्यामागे अनेकांचा अप्रत्यक्षपणे सहभाग असतो. ही यंत्रणा राबविणारे पालिका प्रशासनापासून ते समाजसेवक, राजकीय पदाधिकारी यांना विश्वासात घेवून हा व्यवसाय सुरू ठेवतात. घणसोली परिसरामध्ये फेरीवाल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले होते. पूर्ण रोड व्यापला जात असल्याने व ग्राहकांचीही गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळे येत होते. महापालिकेच्या संकेतस्थळावर याविषयी अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या, परंतु अद्याप याविषयी कारवाई होत नव्हती. घणसोलीचे विभाग अधिकारी दत्तात्रय नांगरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून परिसरातील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. रविवारच्या आठवडे बाजारावर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे अर्ज केला होता. ३० जुलैला पोलिसांनी बंदोबस्त दिल्यामुळे विशेष मोहीम राबवून आठवडी बाजारावर कारवाई करण्यात आली आहे.विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने घणसोलीच्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाºया ८ हातगाड्या, २ सिलिंडर, २ छत्र्या, १५ गोणी साहित्य, बांबू व इतर साहित्य जप्त केले आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी विभाग अधिकारी दत्तात्रय नांगरे यांच्याशी संपर्क साधला असता रविवारी कारवाई करण्यात आली असून नियमितपणे कारवाई करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
आठवडी बाजारावर पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 3:00 AM