काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिला काँग्रेस कार्यकर्त्यांना सज्जड दम
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : महापौर निवडणुकीत काँग्रेसविरोधी भूमिका घेत कोणार्कला साथ देणाऱ्या व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेल्या अठरा नगरसेवकांवर कारवाई होणारच, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी भिवंडीतील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर दिली. त्यामुळे राष्ट्रवादीत दाखल झालेल्या अठरा नगरसेवकांच्या मानेवर निलंबनाची टांगती तलवार कायम आहे. मनपा मुख्यालयासमोर असलेल्या भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालय व स्व. राजीव गांधी चौक नूतनीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रदेशाध्यक्ष पटोले शुक्रवारी सायंकाळी भिवंडीत आले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यालय हे कार्यकर्त्यांचे शक्तिकेंद्र आहे. त्यामुळे पक्ष कार्यालयात समस्या घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांचे मत ऐकून त्याचे निवारण करणे गरजेचे असून, पक्षाची शिस्त पाळणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. पक्ष मोठा आहे, व्यक्ती नाही, हे धोरण सर्वांनी मनावर बिंबवणे गरजेचे आहे. यापुढे पक्षविरोधी कृती करणाऱ्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींविरोधात शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात येईल, असा इशाराही पटोले यांनी दिला.
भिवंडीत काँग्रेस पक्षवाढीसंदर्भात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक पटोले यांनी घेतली. यावेळी माजी मंत्री अरीफ नसीम खान, शहरध्यक्ष रशीद ताहीर मोमीन, दयानंद चोरघे, तालुकाध्यक्ष राकेश पाटील, माजी महापौर जावेद दळवी, प्रदेश सचिव प्रदीप रांका, प्रदेश सरचिटणीस तारिक फारुकी, नगरसेविका रिषिका रांका, मुख्तार खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात सत्ता असूनसुद्धा पक्ष कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आगामी काळात जिल्हास्तरावर पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी मंत्र्यांचे जनता दरबार आयोजित करण्यात येतील, अशी माहिती पटोले यांनी दिली. आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या दृष्टिकोनातून चाचपणी सुरू असून, त्यासाठी राज्यात काँग्रेस पक्ष बळकट करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपले मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. भिवंडीमध्ये अध्यक्षपदावरून वाद सुरू असल्याने तो मिटवण्यासाठी लवकरच दोन कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचे आश्वासन बैठकीत दिले. गटबाजी खपवून घेणार नाही, पक्षविरोधी कारवाई व ध्येयधोरणाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पटोले यांनी दिला.
......
वाचली
===Photopath===
270321\20210326_221129.jpg
===Caption===
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिला काँग्रेस कार्यकर्त्यांना सज्जड दम