ठाणे : घोलाईनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर वन विभागाने तीव्र उतारावरील १२०० अतिक्रमणांवर हातोडा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या अतिक्रमणांना वीज, पाणी, रस्ते, शौचालये आदी सोयी-सुविधा देणाऱ्या महापालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांवर भारतीय वन विभाग अधिनियमानुसार कारवाई का करू नये, असा सवाल वनविभागाने उपस्थित केला. आता या दिशेने वन विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
कळव्यातील घोलाईनगर भागात १९ जुलै रोजी झालेल्या पावसात दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी गेला. मागील काही दिवसांपासून डोंगरावरील तीव्र उताराच्या अतिक्रमणांचे सर्वेक्षण सुरू होते. सर्वेक्षण अहवालानुसार डोंगराच्या तीव्र उतारावर तब्बल १२०० अतिक्रमणे असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी वन विभागाने पावले उचलली आहेत. पुढील आठवड्यापासून कारवाईचे संकेत वन विभागाने दिले; परंतु यापुढे जाऊन आपल्या हद्दीत अतिक्रमणे उभी कशी राहिली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न विभागाने सुरू केला.
या परिसरात २०१९ मध्ये नवीन किती अतिक्रमणे उभी राहिली, ती कोणाच्या अधिकारात उभी राहिली, महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांकडून या अतिक्रमणांना पाणी, रस्ते, शौचालये आदींसह इतर सोयी-सुविधा दिल्या, याची माहिती घेणे सुरू आहे. तसेच महावितरणने नव्याने किती अतिक्रमणांना मीटर दिले, त्या मीटरची नोंदणी केली जात असल्याची माहिती वन विभागाने दिली. ही माहिती मिळताच महापालिका आणि महावितरणला नोटीस बजावणार आहेत. जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर भारतीय वन अधिनियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे वन विभागाने सांगितले.
.........
वाचली