ठाणे - साेशल मीडियावर धार्मिक अथवा जातीय भावना दुखावल्याच्या काेणीही पाेस्ट टाकल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात साेशल मीडियाच्या गैरवापराबाबत वर्षभरात २२ गुन्हे नाेंद झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साेशल मीडियाद्वारे धमकी देणाऱ्यालाही वागळे इस्टेट पाेलिसांनी अटक केली हाेती. दाेन समाजात तसेच धर्मियांमध्ये तेढ निर्माण हाेईल अशा पाेस्ट टाकू नये. अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचा इशारा ठाणे पाेलिसांनी दिला आहे.
सायबर पाेलिसांचे लक्ष
साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर तुम्ही काेणते वादग्रस्त ॲप्लिकेशन वापरता, काेणत्या ग्रुपशी संपर्क करता, यावर सायबर टूल्सद्वारे पोलिसही लक्ष ठेवतात. माॅनिटरिंगद्वारे वादग्रस्त पाेस्ट तातडीने बाजूला काढण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाळा
दाेन समाजांमध्ये तसेच धर्मियांत तेढ निर्माण हाेईल असा मजकूरही साेशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा पसरवला जाताे. अशी पाेस्ट व्हायरल करणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली कायदेशीर कारवाईचा इशारा पाेलिसांनी दिला आहे. साेशल मीडियाचा वापर करताना काेणत्याही धर्माच्या, देवाच्या, नेत्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशा पाेस्ट कराव्यात. धार्मिक भावना दुखावणाऱ्या पाेस्ट टाळाव्यात, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.
वादग्रस्त पोस्टबाबत अलीकडे काेणताही गुन्हा दाखल झाला नाही. दाेन समाजात, धर्मियांमध्ये तेढ निर्माण हाेईल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या जातील, अशा पाेस्ट किंवा अफवा काेणीही पसरवून नयेत. अन्यथा कारवाई केली जाईल. - पराग मणेरे, पोलिस उपायुक्त, सायबर विभाग, ठाणे.
३ वर्षांपर्यंत कारावास दाेन समाजांत तसेच धर्मियांत तेढ निर्माण केल्यास हाेऊ शकताे. गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. अफवा पसरवल्यास किंवा साेशल मीडियाद्वारे व्हायरल केल्यास शिक्षेची तरतूद आहे.