ठाणे : स्मार्ट ठाणे अशी ओळख असलेल्या शहरात जागोजागी ठाणे परिवहन सेवेच्या बसथांब्यांवर बेकायदा राजकीय जाहिराती लावून नेहमीच विद्रूपीकरण केले जाते. मात्र, आता या बेकायदेशीर जाहिरातबाजीला ब्रेेक लावण्यात येणार आहे. अशी बेकायदेशीरपणे जाहिरात लावणाऱ्यांवर यापुढे कारवाई केली जाणार असल्याची नोटीस ठाणे परिवहनच्या बस थांब्यांवर टीएमटी प्रशासनाने लावली आहे.
ठाणे महापालिका, पोलीस प्रशासन आणि टीएमटीने ही नोटीस लावली आहे. त्यामुळे विनामोबदला आपल्या कार्यकर्तृत्वाची जाहिरातबाजी करणाऱ्यांना चांगलाच दणका बसणार आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील लोखंडी बसथांब्यांच्या जागी स्टेलनेस स्टीलच्या थांब्यांनी घेतली. आकर्षकरित्या दिसणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून बस थांब्यांची निगा राखली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या जाहिरातींवरच गल्लीबोळातील लहानमोठे कार्यकर्ते ते थेट मोठमोठ्या नेत्यांच्या वाढिदवसाच्या जाहिराती लावून बस थांब्यांचे आणि पर्यायाने शहराचे विद्रूपीकरण करतात. याबाबत वारंवार पोलीस ठाण्यात तक्रारीही केल्या जातात. मात्र, दोषींवर कोणतीही कारवाई होत नसल्याने अशा जाहिरात बहाद्दरांना मोकळे रान मिळाले होते. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासन, ठाणे परिवहन सेवा, प्रभाग समित्या आणि पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून शहरातील मोक्याच्या बसथांब्यांवर जाहीर नोटीस लावली आहे. यामध्ये बस स्टॉप ही ठाणे पालिकेची खासगी मालमत्ता असून राजकीय जाहिरात, वाढदिवसाच्या शुभेच्छा, हार्दिक स्वागत, शिबिर, श्रद्धांजली अशा कोणत्याही स्वरूपाच्या जाहिराती लावू नये, असे स्पष्ट केले आहे. तरीही जाहिरात लावल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे बजावले आहे.