ठाणे : ढोकाळी येथील एका इमारतीमधील वेगवेगळ्या बाथरूममधून महिला, पुरुष तसेच लहान मुलामुलींचे आपल्या मोबाइलमध्ये गुपचूप शूटिंग करणाऱ्या अविनाश कुमार यादव (३४) या विकृताविरुद्ध पोक्सोअंतर्गतही कारवाई केली जाणार असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. त्याच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोमवारी सायंकाळी सोसायटीच्या महिलांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते.
गेल्या काही दिवसांपासून इमारतीमधील काही महिला तसेच तरुणींच्या अंघोळीच्या तसेच इतर वेळी तो आपल्या मोबाइलमध्ये चित्रण करत असल्याची तक्रार एका महिलेने २३ फेब्रुवारी रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात केली. ही तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या पथकाने त्याला अवघ्या १५ मिनिटांतच अटक केली. तो आयटी इंजिनीअर असून जून २०१८ मध्येच त्याचा विवाह झाला आहे. त्याचा मोबाइल आणि टॅब तपासणीसाठी जप्त करण्यात आला आहे. मात्र, लॅपटॉप त्याच्या पत्नीचा असल्यामुळे त्यातील पडताळणीनंतर तो तिला परत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुरुवातीला याच संदर्भातील १२ तक्रारी असल्या, तरी आतापर्यंत त्याच्याविरुद्ध ३५ ते ४० जणांनी तक्रारी केल्या आहेत. तो इमारतीच्या जिन्याजवळून बाथरूममध्ये मोबाइल ठेवून शूटिंग करत असल्याचे आढळले आहे. त्याची जामिनावर सुटका झाल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला. मात्र, तपासणी करताना लहान मुलामुलींचेही चित्रण आढळल्यामुळे त्याच्यावर पोक्सोअंतर्गतही कारवाई केली जाणार असल्याची ग्वाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिली. त्याची गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्यानंतर रहिवासी शांत झाले.