भिवंडी : भिवंडीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढल्याने पालिका प्रशासनाने शहरात कडक निर्बंध लागू केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार, असा इशारा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी दिला. ही नियमावली १५ एप्रिल रात्री बारापर्यंत लागू असेल.
शहरात बुधवारी ७४ रुग्ण आढळले असून त्यापैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत शहरात एकूण ७ हजार ६८४ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ६ हजार ७९१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात ५३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात कोरोनाचा धोका आणखी वाढू नये यासाठी पालिका आयुक्तांनी नियमावली जाहीर केली आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दुकानांमध्ये पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास दुकान मालकावर कारवाई करण्यात येणार आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत शहरात जमावबंदी असेल.