ठाणे : केंद्र सरकारने क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम जाहीर केला असून या अनुषंगाने ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात क्षयरोगांवर उपचार करणाऱ्या सर्व रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची नोंदणी सक्तीची केली आहे. यासाठी महापालिकेने सर्व रुग्णांना तसे निर्देश दिले असून यामध्ये हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.प्रत्येक क्षयरोगावर उपचार होऊन क्षयरोगाचा प्रसार रोखता यावा यासाठी खासगी रुग्णालये व संस्थांना क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक क्षयरुग्णांची नोंदणी होऊन त्यांच्यावर उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचारात प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे हा या नोंदणीमागील मुख्य उद्देश आहे.नोंदणी करणे अनिवार्य असलेल्या खासगी क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्षयरोग निदान करणाऱ्या शहरातील सर्व पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, प्रयोगशाळा, रेडिओलॉजी, सुविधा असलेल्या संस्था, क्षयरोगावर उपचार करणारे विविध पॅथॉलॉजी, सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, सर्व बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सुविधा, क्षयरोगाची औषधे विक्री करणारे विक्रेते, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट यांचा समावेश यामध्ये असणार आहे.ज्या प्रयोगशाळा डॉक्टर्स, रुग्णालये, औषध विक्रेते, क्षयरोगाची नोंदणी करणार नाहीत अशा संस्था, व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरून अशा सर्वांवर भारतीय दंड विधान कलम २६९, २७० नुसार कारवाई करण्यात येईल. याअंतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तींवर किमान ६ महिने ते २ वर्षांपर्यंत कारावास व दंडाची शिक्षा करण्यात येईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहेृ. यासंदर्भात ज्या प्रयोगशाळा, डॉक्टर्स, रुग्णालये, औषध विक्रेते यांनी क्षयरोगांची नोंदणी करण्यामध्ये टाळाटाळ करून राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला यास्तव क्षयरोग अधिकारी डॉ. प्रसाद पाटील व वैद्यकीय अधिकारी राजू मुरूडकर यांच्या स्वाक्षरीने संबंधितांना समज दिली आहे.
क्षयरुग्णांची नोंदणी न केल्यास होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:07 AM